वज्रेश्वरी :भिवंडी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. तालुक्यातील तब्बल २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे, तर १४ ठिकाणी भाजपने सत्ता बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला तीन ठिकाणी, तर श्रमजीवी संघटनेला दाेन ठिकाणी यश मिळाले आहे. भाजपच्या खासदारांनी मात्र ३० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. भिवंडी तालुक्यातील निकालात शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, काँग्रेसने एक तर श्रमजीवी संघटनेने दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा राखला. स्थानिक पातळीवरील ग्रामविकास कमिटीने १३ ठिकाणी यश मिळविले आहे. काल्हेर ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व १७ सदस्य निवडून आणत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. खासदार कपिल पाटील यांच्या दिवे अंजूर गावात त्यांना सत्ता राखण्यात यश आले. शेतकरी संघटनेने त्यांना कडवी लढत देत तीन सदस्य निवडून आणले आहेत. तर पडघा ग्रामपंचायत निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना शिवसेनेने यश मिळविले तर मनसेने निर्णायक यश मिळविले असून भाजपला मोठे अपयश आले आहे.
चाेख पाेलीस बंदाेबस्त- भिवंडी शहरातील भादवड येथील स्व. संपदा नाईक सभागृहात सकाळी तहसीलदार अधिक पाटील यांच्या उपस्थितीत २५ टेबलवर मतमोजणीस सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी या परिसरात उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. - या संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाच विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे जल्लोष अथवा मिरवणूक न काढता घरी जावे, यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी नोटिसा बजावत होते.