ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी तालु्क्यातील ग्रामपंचायतींनी गावकऱ्यांकडे असलेली त्यांची थकीत घरपट्टी, पाणीपट्टीची तब्बल ९१ लाख ८३ हजार ६१६ रुपयाची थकबाकी शनिवारी घेतलेल्या लोकअदालतीद्वारे मिळविली आहे.
गावकऱ्यांकडील या थकबाकीच्या वसुलीसाठी विधिसेवा प्राधिकरण भिवंडी आणि पंचायत समितीने आयोजित केलेल्या लोकअदालतीला थकबाकीदारांनी शनिवारी भरघोस प्रतिसाद दिल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली. या लोकअदालतीत घरपट्टीची ८८ लाख ३३ हजार २४६ आणि पाणीपट्टीची तीन लाख ५० हजार ३७० अशी एकूण ९१ लाख ८३ हजार ६१६ रुपयांची थकबाकी एका दिवसात वसूल केली आहे. या कामासाठी भिवंडी न्यायालय व पंचायत समिती भिवंडीचे अधिकारी, कर्मचारी व ३४ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.