मनोर : मनमानी कशाला म्हणतात याचे दर्शन रविवारी गांधीजयंती निमित्त तहकूब केलेल्या मनोर ग्रामसभेवरुन समोर आले. तब्बल १२४ ग्रामस्थांची उपस्थिती असतांना सरपंच व उपसरपंच यांनी कोरम पुर्ण नसल्याचे सांगत आपली मनमानी केली.महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व पंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. त्याअनुषंगाने मनोर पंचायतीमध्येही ती आयोजित केली होती. रजिस्टर्ड बुकवर ७१ ग्रामस्थांच्या सह्याही झाल्या होत्या. ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी बसवून सह्या घेतल्या जाण्याची पद्धत अनुसरली गेली नाही. ग्रामस्थ येऊन बसल्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या जाऊ लागल्या. लोकही हळूहळू येताना दिसत होते. ते येण्याची प्रतिक्षा न करता सरपंच जागृती हेमाडे, उपसरपंच साजिद खतिब, सदस्य ग्रामसेवक शिंदे यांनी ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात येते. असे घोषित केले. हा मनमर्जीचा गैरप्रकार माजी सरपंच यशवंत ठाकरे, अनंता पुजारी, संतोष माळी, केतन पाडोसा तसेच ग्रामस्थ संतोष जनाटे, किशन भुयाल, सुरेश डगला, सुधाकर गायकवाड, दामोदर फासट, मदन भोईर यांनी सवाल केला की, १२४ लोकांची उपस्थिती आहे आणि तुम्ही ग्रामसभा तहकूब कशी करतात? हजेरी बुकात ७१ जणांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत व स्वाक्षऱ्या न झालेले ५३ जण सभागृहात आहेत. त्यांच्या सह्या घ्या व सभा सुरू करा परंतु सत्ताधाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिला. वेळ संपून गेली आहे आता ग्रामसभा होऊ शकत नाही असे बोलून सरपंच निघून गेल्या. त्यामुळे येथील ग्रामस्थ नाराज झाले असून निवडणुकीनंतरही पहिले पाढे ५५ असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीच्या मनमानीने मनोर ग्रामसभा तहकूब
By admin | Published: October 05, 2016 2:16 AM