डोंबिवली : भाषा शिकायची असेल तर व्याकरण शिकण्याशिवाय पर्याय नाही. पण, व्याकरणाला लोक घाबरतात किंवा कंटाळतात. त्यामुळे व्याकरणातल्या क्लिष्ट संकल्पना वगळून सोप्या पद्धतीने वाक्यरचना शिकवण्यावर भर देणे गरजेचे असते, असे मत आॅनलाइन मराठी, गुजराथी भाषा शिकवणाऱ्या कौशिक लेले याने व्यक्त केले.पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे मराठी भाषादिनाचे निमित्त साधून शुक्रवारी फे्रण्ड्स कट्ट्यावर डोंबिवलीकर कॉम्प्युटर इंजिनीअर कौशिक लेले याची मुलाखत झाली. कौशिक म्हणाला की, तयार वाक्यांचा भडीमार करण्याऐवजी छोट्या वाक्यांपासून सुरुवात करत पुढे मोठी वाक्ये आणि संपूर्ण संभाषण शिकवणे हे कोणतीही भाषा शिकण्यामागचे सूत्र, समीकरण असते. परदेशी व्यक्तीही घरबसल्या स्व-अभ्यासातून मराठी शिकल्या आहेत. कौशिकने सुमारे साडेतीनशेहून अधिक अमराठी नागरिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी आॅनलाइन लेसन तयार केले आहेत. कौशिक हा पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. ओंकार दाभाडकर यांनी त्याच्याशीसंवाद साधला.>डब्यात असणार या सुविधामुलाखतीत त्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा प्रवास, मिळालेला प्रतिसाद, शिकवताना आलेले अनुभव या पैलूंचा वेध घेण्यात आला. टिळकनगर शाळेच्या सभागृहात प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्याच्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी बोलतानाचे व्हिडीओ बघून प्रेक्षक खूश झाले. मुलाखतीच्या शेवटी प्रेक्षकांसह प्रश्नोत्तरांचा वेळही चांगला रंगला. प्रेक्षकांनी नवीन कल्पना सुचवल्या. मराठी किंवा गुजराथी शिकू इच्छिणाºया प्रत्येकापर्यंत ही संकल्पना पोहोचली पाहिजे. आपले अमराठी शेजारी, सहकारी, मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचे आवाहन कौशिकने केले. तसेच पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी हा खुला संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आणि प्रश्नोत्तरानंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला.
कोणत्याही भाषेसाठी व्याकरण आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 1:44 AM