शहापूर : चेरपोली आणि गोठेघर या दोन ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक वगळता मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याबद्दल तालुक्यातील ८४ ग्रामसेवकांचा घरभाडेभत्ता गोठवण्याचा निर्णय ठाणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे. अंमलबजावणी याच महिन्यापासून करणार असल्याचे शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायती असून ९८ ग्रामसेवक आहेत. त्यापैकी ग्रामपंचायतीत उपस्थित न राहणे, दैनंदिन कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, कामकाज अहवाल सादर न करणे, मीटिंगला अनुपस्थित राहणे, या कारणांवरून तालुक्यातील मढ, शेई आणि गुंडे या तीन ग्रामसेवकांवर आठ दिवसांपूर्वी आणि याआधी जुलैमध्ये एक अशा चार ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली होती.आता शहापूरलगतच्या असलेल्या चेरपोली व गोठेघर या ग्रा.पं.चे ग्रामसेवक वगळता तालुक्यातील उर्वरित सर्व ८४ ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामावर तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्त कामावर झाला. वारंवार कामचुकारपणा करणाऱ्या १६ ग्रामसेवकांची दप्तरतपासणी केली जाणार असून त्या तपासणी अहवालात दोषी आढळल्यास ग्रामसेवकांना बडतर्फ अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
ग्रामसेवकांचा घरभाडेभत्ता बंद
By admin | Published: January 14, 2017 6:03 AM