भिवंडी : मागील आठवड्यात शहरातील जैतुनपुरा समदनगर भागात सशस्त्र फिरणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात संगनमताने खुनाचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी काँग्रेसचे माजी उपमहापौर, नगरसेवक अहमद सिद्धीकी, माजी नगरसेवक अलीमुद्दीन बक्कन सिद्धीकी व त्यांचा भाऊ अश्फाक सिद्धीकी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना पुराव्यासह ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलीस व भिवंडी पोलिसांनी आज सकाळी खंडूपाडा पटेलनगर येथे कोंम्बींग आॅपरेशन केले. या आॅपरेशनमुळे शहरात खळबळ माजली आहे.शहरातील जैतुनपुरा समदनगर भागात सुपर टॉवर बिल्डींगसमोर मागील आठवड्यात शांतीनगर भागातील किडवाईनगरचा रहिवासी मोहम्मद साजीद निसार अन्सारी (३०) व नागावरोड भागातील रहिवासी मोहम्मद दानीश मोहम्मद फारूख अन्सारी (२०) या दोघांना दोन पिस्तूल व भरलेल्या मॅगझिनसह अटक केली होती. या दोन आरोपींनी सदर पिस्तूल विक्रीसाठी फिरत असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु या बाबत पोलिसांच्या तपासात सदर आरोपींचे राजकीय हितसंबध व गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आली आहे. त्याचा तपास करण्यासाठी पुरावा नष्ट होऊ नये या करिता सावधपणे ठाणे पोलीस व भिवंडी पोलिसांनी शहरातील खंडूपाडा पटेलनगर येथे कोम्बींग आॅपरेशन केले.या घटनेतील दोन आरोपींवर खुनाचे कट कारस्थान करणे, हे कलम लावल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. या घटनेबाबत तपास पूर्ण झाल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
आजी-माजी नगरसेवक ताब्यात, राजकीय वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:38 AM