ठाणे : मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट, ठाणे आणि स्वप्रेरणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ग्राहकपेठेचे शुक्रवारी सकाळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष नितीन प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकमत सखी मंच याचे माध्यम प्रायोजक आहे. महिला व लघुउद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने रेल्वे हॉल, ठाणे रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्र.-१ जवळ येथे प्रदर्शन व विक्री असलेली भव्य ग्राहकपेठ भरवण्यात आली आहे. १ मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत ती सर्वांसाठी खुली राहणार आहे. या ग्राहकपेठेत ग्राहकांना पारंपरिक दागिने, इमिटेशन ज्वेलरी, ड्रेस मटेरिअल, साड्या, पर्स, बॅग्ज, मसाले, पिठे, लाडू, लाकडी खेळणी, बेडशीट यांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत. आंब्याचा हंगाम असल्याने आणि ग्राहकांचा आंबेखरेदीकडे असणारा कल लक्षात घेता या ग्राहकपेठेत आंब्याचेही विशेष स्टॉल्स लावले आहेत. कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर सखी मंच सदस्यांना १० टक्के सूट मिळणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता जर्दोसी आणि हॅण्ड एम्बॉयडरीची कार्यशाळा त्याच ठिकाणी होणार आहे. शुक्रवारी ग्राहकपेठेच्या उद्घाटनप्रसंगी मध्य रेल्वे ठाणे इन्स्टिट्यूटचे सर्व अधिकारी उपस्थित होते. तर, त्याच दिवशी दुपारी चंद्रहास रहाटे यांनी मनी मॅनेजमेंट या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. खूप पैसा आल्यावर बचतीला सुरुवात करू, हा चुकीचा समज आहे. त्यापेक्षा सुरुवातीपासून कमी बजेटमध्ये आपल्या गरजा कमी करून व्यावसायिक गरजांना प्राधान्य दिले पाहिजे, असे मत रहाटे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर शैक्षणिकप्रमाणेच आर्थिक धोरणही असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन कसे असावे, याविषयी त्यांनी माहितीही या वेळी दिली. (प्रतिनिधी)
ठाण्यात भव्य ग्राहकपेठेला सुरुवात
By admin | Published: April 29, 2017 1:34 AM