कल्याण : मालमत्तेच्या वादातून नातवाने चुलत आजोबांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील बेतूरकरपाडा परिसरात रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत चुलत काकावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्या करणाऱ्या नातवाला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. (Grandfather killed in property dispute, grandson arrested)
हर्षल ठाणगे (२३) हे आरोपीचे नाव आहे. नारायण, कुंडलिक आणि सुभाष या तिघा भावांनी त्यांचा वडिलोपार्जित भूखंड २०१२ मध्ये विकासकाला बांधकामासाठी दिला होता. याप्रकरणी झालेल्या व्यवहारात दिल्या गेलेल्या दुकानाच्या गाळ्यावरून नारायण आणि कुंडलिक यांच्यात वाद सुरू होता. हा वाद कल्याण न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, या वादातून कुंडलिक यांचा नातू हर्षल याने रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चुलत आजोबा असलेल्या नारायण यांचे घर गाठत त्यांच्यावर खंजीराने वार केले. वडिलांवर वार होत असल्याचे पाहून नारायण यांचा मुलगा दिनेश बचावासाठी आला असता त्याच्यावरही हर्षलने वार केले.
दोघांवर झालेल्या हल्ल्यात आजोबा नारायण यांचा जागीच मृत्यू झाला, तर काका दिनेश हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
काही तासांतच केले जेरबंदया घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, काही तासातच हर्षलला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात हत्या करणे आणि हत्येचा प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.