- प्रज्ञा म्हात्रेठाणे - गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने काढण्यात येणारया नववर्ष स्वागतयात्रेत यंदा आजी आई सहभागी होणार आहेत. जयश्री फाऊंडेशन आणि के. व्ही. सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुरू असणाऱ्या आजी आई शाळेतील विद्यार्थ्यांच्या रुपातील आजीबाईं या स्वागतयात्रेत सहभागी होतील तर दुसरीकडे महिला सशक्तीकरण, पर्यावरण यांवर देखील भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस देखील सहभागी होणार असून ठाणे पोलीसांच्यावतीने चित्ररथांवर सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती केली जाणार आहे.
सोमवारी नववर्ष स्वागतयात्रेची शेवटची बैठक ज्ञानकेंद्र सभागृहात संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने संस्था सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठावर न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष अर्जुन देशपांडे, न्यासाचे सुधाकर वैद्य, संजीव ब्रह्मे, अश्विनी बापट, विद्याधर वालावलकर, तनय दांडेकर आदी उपस्थित होते. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने सायकलप्रेमी पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे अजय भोसले यांनी दिली. यात सायकल सजावट आणि सायकलवर विविध सामाजिक विषयांवर आधारीत स्लोगन पोस्ट केले जाणार आहेत. तसेच, सहभागी सर्वांना मेडल दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचे शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्षे आहे त्यापार्र्श्वभूमीवर मराठा मंडळाच्यावतीने चित्ररथ तयार केला जाणार आहे.
एकलव्य मित्र मंडळाच्यावतीने मल्लखांबाचे चालत्या ट्रकवर प्रात्यक्षिके सादरीकरण केले जाणार आहे तर महाराजांच्या रयतेत अठरा पगड जातीचे लोक होते हे दाखविणारा चित्ररथ सहभागी असेल असे किशोर म्हात्रे याने सांगितले. गाव तेथे सरपंच या संकल्पनेवर आधारीत समतोल फाऊंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेली बालपंचायत यंदा या स्वागतयात्रेत असेल. यातून बालहक्कांचे नियम सांगितले जाणार आहे. तेली समाजाच्यावतीने संत तुकारामांचे गाथा लेखन यावर आधारीत चित्ररथ, पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने ४२ तलावांच्या फोटोंचे प्रदर्शन असणार आहे. स्वागताध्यक्ष देशपांडे यांनी आपल्या संस्कृतीशी तरुण जोडले गेले पाहिजे असल्याचे आवाहन केलेय तर न्यासाचे वैद्य यांनी स्वागतयात्रेच्या समाप्तीला महाआरती व्हावी अशी सूचना केली. पाचव्या घाटावर श्री स्वामी समर्थ मठ, ठाणे पुर्वच्या ५० भगिनी गंगा आरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.