ठाणे : मध्य प्रदेशमधून हरवलेल्या ६५ वर्षीय सुमित्रा देवांगन या तब्बल सहा महिन्यांनी स्वगृही परतल्या आहेत. यात सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. चिडचिड, कधीकधी असंबद्ध बोलणे, परिपूर्ण माहिती न देणे अशा सगळ्या अडचणींतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यांची माहिती कशीबशी गोळा केली आणि त्यातून मायलेकांची भेट घडून आली.सुमित्रा देवांगन यांचे हाड मोडल्याने १७ एप्रिल २०१९ रोजी तुळिंज पोलिसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांची बेवारस म्हणून नोंद केली होती. दरम्यान, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यातून त्यांचा चिडचिडा स्वभाव, कधीकधी वेगळेच बोलणे, परिपूर्ण माहिती न देणे असे प्रकार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर योग्य उपचार तर केलेच, त्याचबरोबर रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद यांनी त्यांना बोलतेही केले. त्यावेळी त्यांनी चापा, जांजगीर, जिल्हा बिलासपूर अशी मोडकीतोडकी माहिती दिली. ती माहिती तुळिंज पोलिसांना दिल्यावर त्यांनी बिलासपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बिलासपूर पोलिसांनी महिलेच्या देवांगन आडनावावरून ती माहिती तेथील देवांगन समाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. त्यानुसार, आजीबाई अनुपपूर येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर, त्यांचा मुलगा श्यामलाल आणि नातेवाइकांनी बुधवारी ठाणे गाठून त्यांना स्वगृही नेले. दरम्यान, ती सहा महिन्यांपूर्वी हरवल्याची तक्रार अनुपपूर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुमित्रा यांना मानसिक विकार असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
सोशल मीडियामुळे आजीबाई स्वगृही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 2:21 AM