उल्हासनगर : महापालिकेने वालधुनी नदीसह नाल्याची साफसफाई सुरू केली आहे. दुसरीकडे नदीपात्रात बांधकामे होत असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी तुंबून झोपडपट्टी भागात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगरातून मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका दरवर्षी सखल व झोपडपट्टी भागाला बसतो. नदीकिनाºयावरील घरांमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर येतात. नदीचे पात्र रुंद व खोल करून दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी वारंवार केली जात आहे. तसेच नदीपात्रातून उल्हासनगर व अंबरनाथ पालिकेने भुयारी गटारांचे पाइप टाकल्याने नदीचे पात्र अरुंद झाल्याची ओरड होऊन पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाइप घेऊन येणाºया वाहनांना नदीपात्रात येजा करण्यासाठी मातीचा भराव टाकला आहे. पावसाळ्यापूर्वी भराव काढण्याची मागणी होत आहे.
एकीकडे पाइपलाइन टाकल्याने नदीपात्र अरुंद होत असताना दुसरीकडे भूमाफियांनी थेट नदीपात्रात बेकायदा बांधकामे सुरू केली.यापूर्वी नदीपात्रातील बेकायदा बांधकामांवर अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी कारवाई केली होती. पुन्हा अशा बांधकामांवर कारवाईचे संकेत शिंपी यांनी दिले. तसेच घरदुरुस्तीच्या नावाखाली पक्की बांधकामे सर्रास उभी केली जात आहेत.