डोंबिवली : छत्रपती शिवराय आणि वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलचे प्रेम, श्रद्धा याची माहिती वडिलांकडून मिळाली. रायगड जिल्ह्यात नियुक्ती झाली, हे भाग्यच होते. कारण वरील दोघाही महापुरुषांचे स्थान रायगड. शिरढोण हे रायगड जिल्ह्यातीलच आहे. या दोन्ही महापुरुषांच्या जागी जाऊन नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले, असे मनोगत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
इतिहास संकलन समिती कल्याण जिल्ह्याने बुधवारी पत्रीपुलाजवळील नेतीवली टेकडीवर असलेल्या गुहेजवळ आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व त्यांचे शस्त्रगुरू क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी केली. त्या कार्यक्रमाला सूर्यवंशी हजर होते.
वासुदेव बळवंतांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रशिक्षणही घेतले. रामोशी, भिल्ल आदी शूरवीरांचे संघटन केले आणि सैन्य उभारुन ब्रिटिशसत्तेला धक्का दिला. याच कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून अ. भा. वि. परिषदेचे माजी कार्यकर्ते मिहीर देसाई या युवकाने अत्यंत स्फूर्तिदायक असे फडके यांच्या जीवनातील प्रसंग मांडले. त्यांना हैदराबादहून पकडून आणल्यावर जनतेच्या अलोट प्रेमाला आणि गर्दीला पाहून ब्रिटिशांना १८५७ ची आठवण झाली. यामुळे घाबरलेल्या इंग्रज सरकारने त्यांना भारतात कैदेत ठेवण्याऐवजी भारतमातेपासून दूर येमेन इथल्या एडनच्या तुरुंगात ठेवले. वासुदेव बळव़ंतांचे प्रसिद्ध वाक्य ‘माझे शरीराचा उपयोग दधिची ऋषींसारखा भारताच्या स्वातंत्र्यासाठी व्हावा’, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास सुरेशराव खेडकर, चंद्रकांत जोशी, दीपक परांजपे, सुखदा रावदेव, विनोद बेंद्रेंसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------
त्या गुहेचे सुशोभिकरण, संरक्षण व्हावे
यावेळी या गुहेचे सुशोभिकरण, संरक्षण, संवर्ध़न करावे, असा मुद्दा इतिहास संकलन समिती, डोंबिवली शहर इतिहास मंडळ, कोकण इतिहास परिषद, कल्याण आणि स्थानिक समाजसेवक व संस्थांनी निवेदन स्वरुपात मांडला. आयुक्तांनीही या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार होईल, असे सांगितले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------
फोटो आहे