अजित मांडके / ठाणेएकेकाळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत असलेले गोविंद मेघवाल धंद्यात फसवणूक झाल्याने अक्षरश: रस्त्यावर आले. मात्र, त्याच्या अंगात जिद्द आणि चिकाटी असल्याने त्यांनी पुन्हा यशाची उंच गुढी उभारण्याचा निर्धार केला आहे. नौपाडा भागात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत टेम्पोमधून शेंगदाणे, चणे विकणाऱ्या ५६ वर्षीय मेघवाल यांची कहाणी ही प्रेरणादायी आहे.एकेकाळी मेघवाल यांचे लोखंड बनवणाऱ्या कंपनीत २५ टक्के शेअर्स होते. त्यांच्या अशिक्षिततेचा गैरफायदा घेऊन काही मंडळींनी त्यांना फसवले. फसवणूक करणाऱ्यांविरोधात न्यायालयीन लढा सुरूच ठेवला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि पुन्हा व्यवसाय करून मोठे ध्येय गाठण्यासाठी त्याने चणे, शेंगदाण्याची फॅक्टरी टाकली आहे. घणसोलीत मेघवाल वास्तव्यास असून पत्नी, दोन मुले, त्यांच्याही पत्नी आणि मुलगी असा मोठा परिवार आहे. गोविंद यांनी आपल्या दोन मित्रांच्या साथीने १९९० मध्ये श्रीकृष्ण प्लास्टिक कंपनी सुरू केली होती. तिघेही अशिक्षित होते. अल्पावधीतच त्यांच्या कंपनीने यश संपादित केले. परंतु, अशिक्षित असल्याने कंपनीचा गाडा हाकायचा कसा, असा पेच त्यांच्यापुढे होता. त्यामुळे दोघांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेऊन दुसरा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याला मेघवाल यांनी हरकत घेतली. त्यानंतर, दोघांनी कंपनी विकून गोविंद यांचा २५ टक्के शेअर लोखंड तयार करणाऱ्या नव्या कंपनीच्या मालकाच्या हाती दिला. त्यानंतर, काही वर्षे गोविंद त्या कंपनीत होते. एक दिवस त्यांना कामावरून कमी करून चक्क घरी जाण्यास सांगितले. मी या कंपनीचा मालक असल्याचे मेघवाल यांनी सांगितले. परंतु, तुम्ही साधे कर्मचारी नसल्याचे उत्तर त्यांना देऊन हाकलून लावण्यात आले. आपल्याच कंपनीतून अशा पद्धतीने काढून टाकण्यात आल्याने मेघवाल हताश झाले. आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह या संकटात ते सापडले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवातीला नकार दिला. अखेर, त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर कुठे तक्रार दाखल झाली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी रोजगार हवाच, म्हणून त्यांनी घणसोलीतच छोटा गाळा घेण्याकरिता सुमारे ७ लाखांचे कर्ज काढले. तेथे गरमागरम चणेशेंगदाणे भाजण्याचे काम केले जाते. या कामात त्यांची दोनही मुले, त्यांच्या पत्नी आणि गोविंद यांची पत्नी तसेच मुलगी मोलाचा हातभार लावतात. पुन्हा शून्यातून यशाची गुढी उभारण्यास गोविंद यांनी सुरुवात केली आहे. पहाटे ४ वाजता उठून चणे-शेंगदाणे भाजले जातात. त्यानंतर, त्यांचा मुलगा सकाळी टेम्पो घेऊन ठाण्यात नौपाडा भागात सोडतो. आइस फॅक्टरी भागात ते याच टेम्पोत बसून चणे व शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय करतात. मुलगा शहरभर फिरून दुकानांतून, पानटपऱ्यांवर चणे, शेंगदाण्याच्या आॅर्डर घेतो. रात्री ९ वाजेपर्यंत चणे-शेंगदाणे विकून हे पितापुत्र घरी जातात. मी हार मानलेली नाही. व्यवसायात पुन्हा यश मिळवण्याची जिद्द असल्याचे मेघवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांची मुलगी एमबीएचे शिक्षण घेत असून मुलगा आयएएसचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. याच व्यवसायातून मुलांना पायावर उभे करायचे असून न्यायालयीन लढा देऊन फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडवायची आहे, असे मेघवाल ठामपणे सांगतात.
चणे खावे लोखंडाचे, हेच ब्रीद!
By admin | Published: March 28, 2017 5:40 AM