ठाणे - ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे आदींसह ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नसणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येत आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्या वेळी जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज कमी रुग्ण आढळून येत होते. कालांतराने या भागात दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यामुळे या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २७०, तर मृतांची संख्या ५६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सर्वेक्षण करण्यावर भर देत आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित करण्याविषयी जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्वारंटाइन सेंटर, फिव्हर क्लिनिक, अँटिजन टेस्टिंग साइट या ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रवृत्त करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले आहे.आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींपैकी ३७६ ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नसल्याने त्या गावांमध्ये कोरोनामुक्तीचा झेंडा रोवला आहे. त्यात मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक १२३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोरोना आजाराचे गांभीर्य, त्यांचे परिणाम याबाबत जनजागृतीचा फायदा झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त, रुग्ण नसणाऱ्या गावांत हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 12:49 AM