सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्याला हिरवा कंदील मिळाला असून ठेकेदाराठी निविदा काढण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिकल एकूण २० बसेस महापालिका परिवहन विभागात दाखल होणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा यापूर्वी ठेकेदारा अंतर्गत सुरू केली होती. नागरीकांचा बस सेवेला उत्स्फूर्त पाठींबा मिळाला होता. मात्र महापालिका व ठेकेदार यांच्यात तिकीट दरवाढीवरून वाद झाला. अखेर ठेकेदाराने टप्प्याटप्प्याने परिवहन बस सेवा बंद केली. तेंव्हा पासून महापालिका परिवहन बस सेवा ठप्प आहे. परिवहन बस सेवा सुरू करण्याला अनेकांनी पाठपुरावा केला. मात्र त्यांना यश आले नाही. महापालिका उपायुक्त पदी नाईकवाडे यांची नियुक्ती झाल्यावर खऱ्या अर्थाने परिवहन बस सेवेची फाईल हलली. अखेर बस सेवा सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली. प्रदूषण विरहित शहर या केंद्र शासनाच्या निधीतून महापालिका एकून २० इलेक्ट्रिकलवर चालणाऱ्या बसेस खरेदी करून, ठेकेदाराला चालविण्यास देण्यात येणार आहेत. मात्र तिकीटाच्या दरवाढीवर महापालिकेचे नियंत्रण असणार आहे.
महापालिका अंतर्गत बस सेवा सुरू झाल्यास, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कॅम्प नं-१ च्या नागरिकाला कॅम्प नं-५ येथे जाण्यासाठी बसने कमीतकमी १५ रुपये लागणार आहे. तर रिक्षांने जाण्यासाठी ६० रुपया पेक्षा जास्त रुपये नागरिकांना द्यावे लागते. तसेच रिक्षाचालकांच्या मनमानीला परिवहन बस सेवेमुळे आळा बसणार आहे. महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष नेत्यांचा आयुक्ताकडे आग्रह आहे. अजीज शेख यांच्या आयुक्त पदाच्या कालावधीत अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. महापालिकेने बांधलेले २५० बेडच्या रुग्णालयाचे लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदींच्या हस्ते उदघाटन होणार आहेत. तसेच धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी अहवाल प्रसिद्ध करणारे, अवैध बांधकामे नियमित करणे आदींच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेणार आहेत. उल्हास नदी किनारी घाट, महापालिका अग्निशमन विभागात दाखल होणाऱ्या उंच इमारतीसाठी लागणाऱ्या गाड्या व शिड्या आदीचे उदघाटनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. एकूणच आयुक्त अजीज शेख यांच्या कालावधीत शहराचे रुपडे पालटत असल्याचे बोलले जात आहे.