ठाणे: कोलबाड येथील एका किराणा दुकानाचे व्यापारी चेतन गोविंद ठक्कर (३५) यांच्यावर एका स्कूटरवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. चेतन यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रानी दिली. चेतन यांच्याकडे दुकानातील दोन लाखांची रोकडही होती. परंतू, या हल्ल्याचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
राबोडीतील पायल ट्रेडर्स या किराणा दुकानाचे मालक गोविंद ठक्कर यांचे चिरंजिव चेतन हे ५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ९.१५वाजण्याच्या सुमारास राबोडीतील तपासेनगर येथील आपल्या दुकानातून शिल्लक राहिलेली दोन लाखांची रोकड घेऊन कोलबाड येथील त्यांच्या घरी येत होते. त्याचवेळी कोलबाड नाका येथील अमृता बिअर बार समोर पांढ:या रंगाच्या एका स्कूटीवरुन आलेल्या दोघांपैकेी एकाने त्यांच्या दिशेने पाठीमागून गोळीबार केला. यात रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी लागून ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त सोनाली ढोले, राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर हे घटनास्थळी दाखल झाले. राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा तसेच शस्त्र अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला आहे. दरम्यान, जखमी चेतन यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.