- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील व्हिटीसी मैदानाची काही क्रिडा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हिटीसी मैदानाची साफसफाई केली असता, मैदानात दारूच्या बॉटलचा खच मिळाला. तीच परिस्थिती गोलमैदान व दसरा मैदानाची झाली असून महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात वृद्ध, मुले, नागरिक आदींसाठी व्हिटीसी, दसरा व गोल मैदान अशी तीन मैदाने आहेत. मात्र तिन्ही मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात मुलांना खेळता यावे म्हणून, कॅम्प नं-४ परिसरातील व्हिटीसी मैदानाच्या साफसफाई साठी भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांनी पुढाकार घेतला. स्थानिक क्रिकेटक्लब, कबड्डी संघ, गोलंदान शॉपर, सामना प्रतिष्ठान आदीं पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मैदानाची साफसफाई दोन दिवासापूर्वी करण्यात आली. साफसफाई वेळी कचऱ्यासह मैदानाच्या बसण्याची जागा व शौचालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच आढळल्याने, क्रीडा प्रेमींना धक्का बसला. शेजारील महापालिका क्रीडा संकुल इमारती मध्ये प्रभाग समिती कार्यालय असून त्यामधील बॅडमिंटन कोर्ट या इनडोअर क्रीडा संकुलची दुरावस्था झाल्याचा आरोप बोबडे यांनी केला.
व्हिटीसी मैदाने प्रमाणे कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाची दुरावस्था झाली असून मैदानात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने सायंकाळच्या ७ नंतर सर्वसामान्य नागरिक मैदानात जाऊ शकत नाही. मैदानाची ताबा भुरटे चोर, नशेखोर, गर्दुल्ले, भिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र असते. महापालिका व पोलीस काहीएक कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच शहरातील प्रसिद्ध गोलमैदाना मध्ये नॉनवेज व दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या महिन्यात मैदानात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांने, मैदानात फिरण्यात आलेल्या महिलांना प्रवेशद्वार बंद करून कोंडून घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. तर शेजारील उद्यानात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचा गैरफायदा घेऊन महिलांचे खून यापूर्वी झाले. नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी तिन्ही मैदानाचे नुतनीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
उद्यानावर भूमाफियांची नजर, नुतनीकरनाची मागणी
महापालिकेने नेताजी, नाना-नाणी पार्क, सपना गार्डन, लाल लोई अश्या मोजक्याच उद्यानाचे नुतनीकरण केले. इतर उद्याने नुतनीकरनाच्या प्रतीक्षेत असून कितपत पडलेल्या उद्यानाचा गैरवापर होत आहे. भूमाफियांचा डोळा असलेल्या उद्यानाची नागरिकांसाठी दुरुस्ती व नुतनीकरण करण्याची मागणी होत आहे.