कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांकरिता मोठी मैदाने राखीव करण्यासाठी लवकरच चढाओढ होणार आहे. मात्र, मैदानांसाठी लागणाऱ्या परवानगी अर्जात केडीएमसीने अटीशर्ती घातल्या असून, शुल्काची रक्कमही जाहीर केली आहे. त्यानुसार डोंबिवलीतील क्रीडासंकुल आणि कल्याणमधील सुभाष मैदानासाठी सर्वाधिक शुल्क मोजावे लागणार आहे.केडीएमसी हद्दीत डोंबिवली पश्चिमेला भागशाळा, पूर्वेत हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, कल्याण पश्चिमेत सुभाष मैदान, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड), फडके मैदान, तर पूर्वेत दादासाहेब गायकवाड क्रीडांगण अशी मोठी मैदाने आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथमधील नेताजी मार्केट ग्राउंड, गावदेवी मैदान, तर उल्हासनगरमधील गोलमैदान, व्हीटीसी ग्राउंड आणि दसरा मैदान या मैदानांवरही प्रचार सभा होतात. मात्र, केडीएमसीसह अन्य महापालिका, नगरपालिकांमध्येही मैदाने राखीव करण्यासाठी अद्याप अर्ज आलेले नाहीत.केडीएमसीने तयार केलेल्या परवानगी अर्जात अटीशर्ती नमूद केल्या आहेत. त्यात आचारसंहिता पाळण्याचे आवाहन करण्याबरोबरच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीनुसार मैदान प्रचारासाठी उपलब्ध करून दिले जाईल, याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. सभा झाल्यावर मैदानांची साफसफाई व खाचखळगे भरून देण्याची जबाबदारी संबंधित पक्षांवरच राहील. त्याचबरोबर मैदानांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही केडीएमसीकडून स्पष्ट केले आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर काही कारणास्तव कोणतीही घटना घडल्यास व त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानास महापालिका जबाबदार राहणार नाही व त्याची नुकसानभरपाई दिली जाणार नाही. कोणतीही दुर्घटना, चेंगराचेंगरी होणार नाही, याची काळजी घ्यावी, गर्दीचे नियोजन करावे, याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित पक्षाची राहील, असेही अर्जात म्हटले आहे.क्रीडासंकुल, सुभाष मैदान सर्वात महागडेसुभाष मैदान आणि क्रीडासंकुल निवडणूक प्रचारसभेसाठी वापरायचे झाल्यास ३७ हजार ५०० रुपये शुल्क केडीएमसीकडून आकारले जाणार आहे.त्याखालोखाल वासुदेव बळवंत फडके मैदान शुल्क १५ हजार रुपये, यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राउंड), दादासाहेब गायकवाड क्रीडांगण आणि डोंबिवलीतील कान्होजी जेधे (भागशाळा) या मैदानांसाठी प्रत्येकी साडेसात हजार रुपये शुल्क प्रतिदिन आकारले जाणार आहे.मैदानांच्या परवानगीसाठी अनामत रक्कम म्हणून सुभाष मैदान आणि क्रीडासंकुलासाठी २५ हजार रुपये, फडके मैदानासाठी १५ हजार रुपये, तर उर्वरित मैदानांसाठी सहा हजार रुपये भरावे लागणार आहेत.
प्रचारासाठी मैदान हवंय, मग नियम पाळा! अटीशर्ती, शुल्कही निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:16 AM