ठाणे : जिल्ह्यातील पाणी पातळी अतिशय उथळ आहे. तर जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे. त्यामुळे भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के आहे. त्यामुळे केंद्रीय भूमीजल बोडार्ने पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिण्याच्या सूचनेसह ठिबकचा वापर केल्यास वार्षिक ४.३७ दशलक्ष घनमीटर (दशलघमी) पाण्याची बचत जिल्ह्यात होईल, अशा सुचना व मार्गदर्शक अहवाला आज निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यात भूजल पातळीविषयी सखोल मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या आहे.
जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल परदेशी यांच्याकडे आज सोपविला आहे. त्यानुसार भूजल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा, पाटबंधारे, जलसंधारण, कृषि आदी विभागांना हा अहवाल उपलब्ध करून या अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांवर काम करण्याची सूचना परदेशी यांनी यावेळी केली. यावेळी केंद्रीय भूज बोडार्चे वैज्ञानिक व प्रभारी अधिकारी डॉ.जे. दाविथुराज, वैज्ञानिक संदीप वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे ठाणे येथील वरिष्ठ वैज्ञानिक मृणालिनी लोखंडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय बोर्डे भूजल पातळीवरील हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केला आहे. त्याव्दारे जिल्हह्यातील विविध वैशिष्ट्ये निदर्शनात आणून देत सूचनाही करण्यात आल्या आहे. यामध्य जिल्ह्यातील चार हजार ९१ वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी दोन हजार १०६ वर्ग किलोमीटर क्षेत्र हे पहाडी क्षेत्र आणि बसाल्ट खडकाने व्यापलेले आहे. झिज झालेल्या खडकांची जाडी ही ५ ते १८ मीटर आढळून आली. जिल्ह्यात भूजल विकासाची स्थिती सरासरी ही १९ टक्के असून कमी जल उत्पादकात असलेले जलधर आढळून येत आहेत. जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे आदी वैशिष्ट्य व सूचनांचा उहापोह या अहवालात करण्यात आला आहे.
या व्यवस्थापन अहवालाव्दारे भूजलाची मागणी व पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये पाणी पातळी अतिशय उथळ असल्याने आणि भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के असल्यामुळे पुरवठा व्यवस्थापन सुचविण्यात आले नाही. मात्र, पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिण्याची सूचना केली आहे. ठिबकचा वापर केल्यास वार्षिक ४.३७ दशलघमी पाण्याची बचत जिल्ह्यात होईल. यामुळे जिल्ह्यातील ११ हजार ३० हेक्टर क्षेत्र शाश्वत भूजल सिंचनाखाली येईल. - हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी चार हजार ३०४ विहिरी व ७१९ विंधन विहिरी अहवालात सुचविण्यात आल्या आहेत.
जेथे पाण्याची पातळी खोलावर गेली आहे अशा क्षेत्रासाठी समतल बांध नाला बंडिंग, गल्ली प्लगिंग यासारख्या कामे सुचविण्यात आली आहेत. लाभक्षेत्रामध्ये भूपृष्ठ जल व भूजलाचे नियोजन करणे आवश्यक आहे. शहापूर व मुरबाडमध्ये भूजल पातळी वाढविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलधर नकाशे तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूजल पातळी, भूस्तराची स्थिती आदींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. सन २०२२-२३च्या या अहवालमध्ये जिल्ह्याच्या सात तालुक्याचा समावेश जलधर नकाशामध्ये करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करून तो जिल्ह्यात राबविण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी भूजल व्यवस्थापन आराखडाही सुचविण्यात आला आहे.
या भूजल व्यवस्थापन आराखड्यात उपाय योजना केंद्रीय भूजल बोडार्ने सूचवल्या आहेत. या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, जलधर प्रणालीचे प्रकार व वैशिष्ट्ये, सिंचन व नकदी पिकासाठी भूजल उपशाचा भूजलावर येणार ताण, मयार्दीत भूजल उपलब्धता, भूजल पातळीतली चढउतार, भूजल गुणवत्ता, जिल्ह्यातील भूगर्भस्थिती, माती व जमिनीचा वापर यांचा अभ्यास करून अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अहवालात सुचविलेला आराखडा राबवित असताना भूजलावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून जिल्ह्याचा भूजलावर आधारित शाश्वत विकास साधता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे.