ठाणे : राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यानुसार, आता ठाण्यातही बदलाचे वारे सुरू झाले आहेत. अशा स्थितीत ठाणे शहराचे अध्यक्ष संदीप लेले यांची जागा कोण घेणार, असा सवाल उपस्थित झाला असून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे भाजपच्या गटनेतेपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने या पदाची बाजी कोण मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी तीन ते चार जणांची नावे आघाडीवर आली आहेत.
राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आले असले, तरी भविष्यातील समीकरणे तयार करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, राज्यात विविध ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत. त्याअनुषंगाने ठाण्यातही जिल्हाध्यक्ष आणि भाजप गटनेते यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यात या पदांसाठीही नवीन नावे पुढे येणार आहेत. २०२२ साली ठाणे महापालिकेची निवडणूक असल्याने त्या अनुषंगाने ठाणे शहरासाठी स्वच्छ आणि उच्चशिक्षित चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपचा आहे.
त्यानुसार, यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे नाव आता आघाडीवर आले आहे. आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी, बांधणी करण्यासाठीच त्यांची निवड निश्चित मानली जात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे भाजपचे विद्यमान गटनेते नारायण पवार यांचाही कार्यकाळ संपुष्टात आल्याने आता त्यांच्या जागेवर कोण विराजमान होणार, याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामध्ये मनोहर डुंबरे यांच्यासह संजय वाघुले यांचे नाव पुढे आले आहे. इतर काही नगरसेवकही या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावून असल्याचे बोलले जात आहे. पुढील आठवड्यात या दोनही नावांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने ठाण्यातही भाजप मित्रपक्षातून विरोधी बाकावर आला आहे. त्यामुळे आता या तिघांचा सामना करण्यासाठी पक्ष कोणाच्या नावाचा विचार करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.