ठाणे : आरोग्यसेवेच्या कामकाजात हातभार लावणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना नोव्हेंबरपासून मानधन मिळालेले नाही. या मानधनासह सध्याचे मानधन ताबडतोब मिळावे यासाठी १७ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका संघाकडून मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे.आशा व गटप्रवर्तकांना नोव्हेंबरपासूनचे केंद्र व राज्य सरकारचे मानधन देण्यात आले नाही. महानगरपालिकांतील आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदलाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना मासिक एक हजार रुपये व गटप्रवर्तकांना मासिक ५०० रुपये मोबदला जुलैपासून अदा करण्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यांना महिन्याच्या ७ तारखेच्या अगोदर मोबदला देण्यात यावा. एचबीएनसीचे फॉर्म आरोग्य केंद्रांत मुबलक प्रमाणात देण्यात यावेत. ऑडिट जबाबदारी व कॅशबुक लेखन इ. जबाबदाऱ्या गटप्रवर्तकांवर न लादता अकाउंटंट व क्लार्कवर सोपवव्यात. गटप्रवर्तकांची सेवा ११ महिन्यांनंतर खंडित करता कामा नये, आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे.मंत्रालयासह सर्व जिल्हा परिषदांवर मोर्चे काढण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्हा परिषदांच्या व या विभागांतील महानगरपालिकांच्या आशा स्वयंसेविकांचा मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येणार आहे. त्याकरता या परिसरातील आशा व गटप्रवर्तकांनी १७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका संघाचे नेते एम.ए. पाटील, बृजपाल सिंह, भानुदास पाटील, नीलेश दातखिळे, आशा गांगुडें, भगवान दवणे, मंगेश लाड, राजेश सिंह, रश्मी दिनकर म्हात्रे, सुवर्णा कांबळे आदींनी केले आहे.
आशांसह गटप्रवर्तक मंत्रालयावर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:39 AM