अंबरनाथ : शहरात सुरू करण्यात आलेला पुस्तक नगरी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अंबरनाथची वाङ्मयीन श्रीमंती अशीच वृद्धिंगत होवो, वाचकांची अभिरूची सातत्याने वाढत राहो, असे आशीर्वाद पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी दिले.अंबर भरारी, ग्रंथाभिसरण मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने अंबरनाथमध्ये या उपक्र माचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण झाले. मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानात हा सोहळा झाला. इतिहास, कला, कथा, कादंबरी, पत्रकारिता अशा विविध विषयांची पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.साहित्य नगरी नावाची चळवळ वर्षभरापासून अंबर भरारी या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली होती. यात ग्रंथाभिसरण संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सहकार्य करण्यात आले. या उपक्र मासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत या उपक्रमासाठी सर्वसामान्य वाचक, सरकारी अधिकारी, साहित्यिक संस्था, सामाजिक संघटना, पत्रकार यांनी पुस्तके दान केली.ज्या प्रमाणे तारे आकाशात असल्याने आकाशाचे सौंदर्य अधिक खुलते, तसे या जगात कवी, साहित्य, पुस्तके असल्याने आनंद मिळतो. या जगातून कवी, साहित्य, साहित्यिक, पुस्तके नष्ट झाली तर जगात काय उरेल असा सवाल कर्णिक यांनी यावेळी केला. आपल्या मनाला, आत्म्याला आनंद देण्याचे काम पुस्तक, साहित्यातून होत असते. अंबरनाथ हे साहित्यावर अपार प्रेम करणारे शहर आहे म्हणूनच लोकसहभागातून ‘साहित्य नगरी’उभारणारे पहिले शहर म्हणून मान मिळाला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वि. स. खांडेकरांचे जावई कर्नल श्रीराम पेंढारकर यांची या सोहळ्यात भेट होणे हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याचेही त्यांनी सांगितले.भिलार येथे सरकारला कोट्यवधी खर्च करून जे यश मिळाले नाही ते अंबरनाथ मध्ये लोकसहभागातून पुस्तक नगरी साकारून मिळाले, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ही नगरी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांपेक्षा साहित्य संस्कृती क्षेत्रात सर्वात पुढे जाईल आणि म्हणूनच या शहराचा खासदार असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. या शहरात चित्रपट महोत्सव, शिवमंदिर महोत्सव, साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन असे उपक्र म यशस्वी होत आहेत. म्हणूनच या शहरात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या नावाने साहित्य उद्यान साकारले आहे. डॉ. महेश केळुस्कर, प्रदीप ढवळ, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आदी मान्यवरांची भाषणे झाली.भविष्यात १०० केंद्रे उभारण्याचा निर्धारया माध्यमातून सध्याच्याघडीला २० हजार पुस्तके जमा झाल्याची माहिती अंबर भरारीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली. या पुस्तकांच्या मदतीने शहरातील ३५ ठिकाणी पुस्तकांचे केंद्र उभारण्यात आले आहे.येत्या काळात १०० केंद्र उभारून त्यात विविध विषयांना वाहिलेल्या पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
वाड्मयीन श्रीमंती वाढो- मधु मंगेश कर्णिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:41 PM