लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ठाणे जिल्ह्यात गावठी दारूच्या अड्डयावर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागासह शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून अशा अड्डयांवर धडाकेबाज कारवाई सुरु आहे. या काळया व्यवसायामध्ये प्रचंड मोठया प्रमाणात होणारी आर्थिक उलाढाल आणि त्याप्रमाणात कूचकामी ठरणारी सरकारी यंत्रणा यामुळेच वारंवार कारवाईचा बडगा उगारूनही दारुचा व्यवसाय तेजीत असल्याचे जिल्हाभर पाहयला मिळते.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील माणेरा गाव, कल्याणची अंजूर खाडी, डोंबिवलीतील देसाई, दिवा आणि खर्डी तसेच भिवंडीतील केवणी आणि मामी खाडी हा संपूर्ण परिसर गावठी दारुच्या अड्डयासाठी प्रसिद्ध आहे. २००४ मध्ये मुंबईतील विक्रोळीमध्ये विषारी दारुकांडामुळे १०५ जणांचे बळी गेले. त्यावेळी खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने तत्कालीन पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलिसांवर कारवाई केली होती. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक गावठी दारूच्या माफियांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर ठाण्यातील येऊरच्या जंगलातील, भिवंडीच्या केवणी खाडी आणि कालवार भागातील अड्डे आता पूर्णपणे बंद झाल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. त्यामुळे पूर्वी एकटया ठाण्यातून दिवसाला १५० ते २०० वाहने गावठी दारुच्या वाहतुकीमध्ये गुंतलेली असायची. ती आता अवघ्या १० ते २० टक्क्यांवर आल्याचे या व्यवसायातील जाणकार सांगतात.
ठाणे जिल्हयातील बहुतांश दलदलीच्या खाडी किनारी असलेल्या घनदाट तिवरांच्या जंगलामध्ये या गावठी दारूची चोरून राजरोसपणे निर्मिती केली जाते. गूळ आणि नवसागराच्या उच्च तापमानातून ती गाळली जाते. एखाद्या अड्डयावर किमान पाच ते जास्तीत जास्त ५० ड्रम पर्यंतही दारूची निर्मिती होते. अशा एका ड्रममध्ये २०० लिटरचे प्रमाण गृहित धरले तरी एका ठिकाणी सुमारे दहा हजार लिटर दारूचे किमान उत्पादन होते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. यातून पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, राजकीय नेते आणि स्थानिक गुंडांनाही ‘मॅनेज’ करण्याचे कसब गावठीचा धंदा करणाऱ्यांनी अवगत केलेले असते. तरीही कारवाई झालीच तर त्यांना चकवा देण्यासाठी खास प्रशिक्षित मुलांची टीमच या अड्डा चालकांच्या दिमतीला असते. दिवसा उजेडी कारवाई करणाऱ्यांना सोपे जाते म्हणून दारू रात्रीच्यावेळी गाळण्याचे काम दारूमाफिया करतात. गाळलेली दारु लोखंडी ड्रममध्ये भरून ती रात्रीच्या अंधारातच खाडीकिनारी आणून दिवस उजाडण्यापूर्वीच ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील झोपडपट्टी आणि कामगार वस्तीच्या परिसरात विक्रीसाठी नेली जाते. यामध्ये कोट्यावधींची उलाढाल होते.कारवाईनंतरही अड्डे सुरूचनिवडणुका जवळ आल्या की, राजकीय पक्ष, नेत्यांकडून आमिषे दाखवली जातात. त्यात गरिबांसाठी पैशाबरोबरच गावठी दारूही मोठ्या प्रमाणात पुरवली जाते. खाडीकिनारी, कांदळवन, दलदलीच्या ठिकाणी गावठी दारू तयार केली जाते. यंंत्रणा आपल्यापरीने कारवाई करतात; मात्र हा व्यवसायपुन्हा उभारी घेतो. जिल्ह्यात बिनदिक्कतपणे सुरु असलेल्या या अड्ड्यांबद्दल ‘लोकमत’चे जितेंद्र कालेकर, कुमार बडदे, धीरज परब, सचिन सागरे यांनी घेतलेला आढावा.मॅथेनॉलची किकगावठी घेणाºयाला नशा येण्यासाठी (किक बसण्यासाठी) मॅथेनॉलचाही सर्रास वापर होतो. पण त्याचे प्रमाण जर अधिक झाले तर मात्र विक्रोळी दारु कांडासारखे प्रकार घडतात. सध्या अशा मॅथेनॉलचा तुरळक वापर होतो. खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या जंगलामध्ये कुणालाही सहज शिरकाव करता येत नाही. केलाच तरी त्याला बाहेर पडताना द्रविडी प्राणायम करावा लागतो. याशिवाय पाण्याच्या सहज उपलब्धतेमुळे खाडी किनारेच दारु अड्डयासाठी वापरले जातात.नेहमीच धोक्याची टांगती तलवारअंबरनाथच्या माणेरा आणि नेवाळी गावात तर कारवाई करायची म्हणजे अधिकाºयांकडे मोठे धाडसच लागते. तिथे होडीशिवाय, कंबरे इतक्या गाळामध्ये जावे लागते. बाहेर पडतांना दोरानेच एकमेकांना सावरत रस्ता शोधावा लागतो. अगदी अलिकडेच एका पथकाने पोकलेनच्या मदतीने तलावातून सुमारे दहा हजार लिटर रसायन बाहेर काढले होते.या कारवाईनंतर या पथकाला कटर पुरविणारे आणि जेसीबी डंपर देणाºयांवरही दारु माफियांनी हल्ला केला होता. ठाणे भरारी पथकातील निरीक्षक सुनील कणसे यांच्या वाहनाचा पाठलाग करून काही गुंडांनी लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटनाही तीन महिन्यांपूर्वी घडली होती. यातून ते सुदैवाने बचावल्याचे याच विभागाचे अधिकारी सांगतात.संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी असलेल्या भरारी पथकामध्ये एक निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक आणि पाच ते सहा कर्मचारी इतकाच कर्मचारी वर्ग आहे. हल्ले होतील, या भीतीने कोणी खबरी नाही. त्यामुळे दारु अड्डयाची खबर काढण्यापासून ते कारवाई करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही या अधिकाºयांना करावी लागते. गुंड आणि दारु माफियांचा सामना करत कोणतीही सबब पुढे न करता, ही कारवाई केली जाते.असा देतात यंत्रणांना चकवासर्व खबरदारी घेऊनही दिवा, अलिमगढ खाडी, अंजूर खाडी अशा भागात जर पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी धाडसत्र राबविले तर बोटींच्या आधारे दारुची निर्मिती करणारे आणि व्यावसायिक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावरून नाहीसे होतात. याउलट, वर्षाला सुमारे २२९ कोटींचा महसूल मिळवून देणाºया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांकडे आजमितीला स्वत:ची बोटही नाही. एका खासगी बोटीचा कारवाईसाठी आधार घेतला जातो. अशाच दलदलीच्या ठिकाणी जर छापा घालायचा झालाच तर बोटीशिवाय स्वत:चा जीव धोक्यात घालून अपुºया संख्येनिशी या अधिकाºयांना जावे लागते. तशीच अवस्था ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचीही आहे. रायगडला तर अशाच कारवाई दरम्यान बोट कलंडली आणि एका अधिकाºयाचा मृत्यू झाल्याची घटना आजही या विभागातील अधिकाºयांच्या अंगावर काटा आणते. त्यामुळे सुसज्ज बोटींसह ती चालविणारे आणि पट्टीच्या पोहणाºयांचीही उत्पादन शुल्क विभागात नितांत गरज आहे. या विभागाला अपुºया संख्याबळाबरोबरच वाहनांचीही कमतरता आहे.दारुची निर्मिती किंवा विक्री हा जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे रोखीचा किंवा तसाच लायक जामीनदार दिल्यानंतर न्यायालय किंवा पोलिसांकडून त्यांची सुटका होते. मग पुन्हा त्याच ठिकाणी अड्डा टाकण्याऐवजी ठिकाण बदलण्यात येते. कधी ठिकाण बदलून तर कधी अड्डयावरील कर्मचारी बदलून हा दारुचा गोरखधंदा खाडीच्या दाट झुडपामध्ये अव्याहतपणे सुरु आहे.असा आहे ठाणे जिल्ह्याचा ताफाराज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली कल्याण आणि ठाणे विभागाच्या दोन उपअधीक्षकांसह ११ विभागाचे ११ निरीक्षक, २२ दुय्यम निरीक्षक आणि कर्मचारी असा १२४ कर्मचाºयांचाताफा आहे.