उल्हासनगर : महापालिका साफसफाई खाजगीकरणाला वाढता विरोध बघून साफसफाईच्या ठेक्यातील कंत्राटी कामगारांनी नोकरी जाण्याच्या भीतीने एकत्र येत आयुक्ताना निवेदन दिले. या प्रकाराने साफसफाई खाजगीकरणांचा प्रश्न तापणार असल्याचे संकेत कामगार संघटनेने दिले.
उल्हासनगर महापालिकेत एकून १५५० सफाई कामगारांचे पदे मंजूर असूनH प्रत्यक्षात ९५० सफाई कामगार कार्यरत आहेत. तर तब्बल ६०० पदे रिक्त आहेत. सफाई कामगार कमी असल्याने, त्याचा परिणाम शहरातील साफसफाईवर होतो. अखेर शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वावर प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचा ठेका एका स्थानिक खाजगी कंपनीला दिला. सप्टेंबर २०२१ मध्ये साफसफाईच्या खाजगीकरण प्रस्तावाला महासभेत बहुमतानें मंजुरी दिलीं. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा होता. त्यानुसार १ मार्च २०२३ पासून २७० साफसफाईच्या मदतीने प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे काम सुरू केले.
स्वच्छता अभियानात सातत्य ठेवण्यासाठी व नागरिकांना स्वच्छ व सुंदर शहर आरोग्यदायी शहर ठेवण्यासाठी सर्वसाधारण सभेत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयावर शहरातून टीकेची एकच झोळ उठली होती.
दरम्यान कामगार संघटना व विविध सामाजिक संघटनांनी साफसफाईच्या खाजगीकरणला विरोध करून ठेका रद्द करण्याचे निवेदन दिले. तसेच गेल्या आठवड्यात मनसे कामगार संघटनेने महापालिका प्रवेशद्वार समोर ठिय्या आंदोलन करून निषेध केला. यावेळी आयुक्तांनी प्रस्तावात चुकीच्या अटीशर्ती असल्यास कारवाईचे संकेत दिले. याप्रकारने आपल्या नोकऱ्या जातील, या भीतीतून साफसफाई कामातील कंत्राटी कामगारांनी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन नोकरी जाऊ देऊ नका. असे निवेदन दिले. याप्रकारने साफसफाईचे खाजगीकरण ठेका वादात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.