- सुरेश लोखंडेठाणे : शहापूरच्या कसारा घाटासह मुरबाडच्या माळशेज घाटात बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले. पावसाळ्यातील दाट जंगलाऐवजी ते आता मोकळ्या माळरानावर दिसत आहेत. त्यांच्या नजरेत सध्या भीती नसली, तरी ते कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे जंगलात जाताना सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त करून वनविभागाद्वारे बचावात्मक जनजागृतीदेखील केली जात आहे.माळशेजसह कसारा घाटात दोन वर्षांपूर्वी २०१५ पर्यंत तरी बिबट्यांचा फारसा वावर नव्हता. मात्र, जुन्नरचे जंगल व पनवेलच्या अभयारण्यातील या बिबट्यांनी आता कसारा व माळशेज घाटांत वास्तव्य सुरू केले. माळशेज घाटाच्या या सह्याद्री पर्वताच्या रांगांच्या जंगलात सध्या सुमारे चार ते पाच बिबट्यांचे वास्तव्य आढळून आल्याचा दुजोरा वनअधिकारी (आरएफओ) तुकाराम हिरवे यांनी दिला. तुरळक घटनावगळता सध्या त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. दाट जंगलात गेलेल्या शेळ्या, मेंढ्यांसह जनावरांवर त्यांच्याकडून हल्ला होऊ शकता. यावर मात करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.बिबट्या जंगलात आढळल्याचे कळताच त्यात्या गावांमध्ये जाऊन वस्तुस्थिती समजून घेतली जात आहे. आतापर्यंत ज्याज्या गावांच्या जंगल परिसरात बिबट्या आढळल्याचे लक्षात येताच तेथील शासनाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन जागृती सुरू आहे. यामध्ये ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील आदी कर्मचाºयांच्या कार्यशाळा घेऊन बिबट्यापासून बचावात्मक उपाययोजना सांगितल्या आहेत. आताही ३० आॅक्टोबर रोजी टोकावडे पोलीस ठाणे परिसरातील पोलीस पाटील यांची कार्यशाळा आयोजित केली. सुमारे ७५ पोलीस पाटील या कार्यशाळेत उपस्थित राहणार असल्याचे हिरवे यांनी सांगितले. वस्तीमध्ये येऊन बिबट्याचा सद्य:स्थितीला हल्ला होणार नाही. पण, ते वावरत असलेल्या दाट जंगलात त्याच्याकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला त्यांचा प्रजननकाळ सुरू असल्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. पण, त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी वावर दिसल्यास ते हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची जाणीव ठेवून माळशेज व कसारा घाटात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी वीकेण्डला धावणाºया मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटक तसेच शेतकरी, मेंढपाळ आणि गुराख्यांना या बिबट्यांपासून सावधान राहण्याचा इशारा वनखात्याने दिला.>शोधासाठी जंगल पिंजून काढले होते; आदिवासी गावपाड्यांच्या जंगलपट्ट्यांत बिबट्याचा हैदोसजुन्नर व पनवेल परिसरांतील अभयारण्यातून आलेल्या या बिबट्यांनी मागील दोन ते तीन वर्षांपासून या जंगल परिसरात हैदोस घातला आहे. सध्या त्यांच्याकडून नुकसान झाले नाही. मात्र, २०१६ मध्ये कल्याण-नगर या राष्टÑीय महामार्गावरील टोकावडे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील साखरवाडी, मोरोशी, सोनावळे, सिंगापूर, शिरोशी, माळ, सावरणे, हेदवली, खापरी, फांगणे, फांगूळ, गव्हाण, मानिवली, पळू या आदिवासी गावपाड्यांच्या जंगलपट्ट्यात बिबट्याने हैदोस घातला होता. त्यास पकडण्यासाठी सुमारे २६ दिवस वनविभागाने सुमारे ७० जवानांच्या सशस्त्र दलाच्या पथकास तैनात करून जंगल पिंजून काढले होते. यावेळी त्याने सोनावळे येथील शेतकरी बारकू भोईर यांच्या पाठीमागून हल्ला करून मानेला पकडल होते. तर, सिंगापूरजवळील वाघेवाडीतील मीराबाई वारे यांच्यावर पहाटेच्या वेळी हल्ला करून ठार केले होते.या दोन जणांसह २३ गायी, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या होत्या. यावेळी साखरवाडी, पांगूळगव्हाण, मोरोशी या गावांच्या जंगलात दोन पिंजरे व ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यानंतर, सशस्त्र दलासह स्थानिक पोलीस, सशस्त्र पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण आणि खाजगी वन्यप्राणिमित्र आदींच्या सुमारे १०० ते १५० जणांच्या पथकाने मोरोशी, सिंगापूर, सोनावळे, पळू या गावांचे जंगल याआधी पिंजून काढलेले आहे.साखरेधार गावातील शेतकरी मधुकर पवार यांच्या चार बकºया आॅगस्ट २०१५ मध्ये बिबट्याने खाल्ल्या होत्या. तो बिबट्या या साखरेधार गावाजवळील फार्महाउसच्या खोल्यांमधील अडगळीच्या सामानाचा सहारा घेऊन अंधाºया खोलीत बसलेला असताना त्यास गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन ब्लोपाइपमधून सोडून त्याला मारले होते.
कसारा घाटासह माळशेज घाटात बिबट्यांचा वाढता वावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:15 AM