ठाणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन अवघ्या महिनाभरातच ग्राहकांची खिसा कापला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. कंपन्या आणि विक्रेत्यांनी अनेक वस्तुंच्या एमआरपीवर हा कर लावण्यास सुरूवात केल्याने ग्राहकांना दुप्पट भूर्दंड सोसावा लागतो आहे. जीएसटीच्या बदल्यात जे कर रद्द झाले आहेत, ते एमआरपीतून वजा न केल्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे बाजारात अजूनही मंदीसारखेच वातावरण आहे आणि परिस्थिती सुधारावी म्हणून दुकानदारांनी जीएसटी न आकारता आधीचा स्टॉक सेल म्हणून विकण्याचा, कराशिवाय व्यवहाराचा फंडा कायम ठेवला आहे.आधीच महामार्गापासून ५०० मीटरच्या अंतरात असलेल्या बारना बसलेल्या फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाºया हॉटेल व्यवसायाला, वाहन खरेदीला जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ मिठाई, फरसाण विक्रेते, एकत्र किराणा-वाण सामान खरेदी करणारे ग्राहक, पॅकबंद वस्तुंचे विक्रेते यांना त्याचा थेट फटका बसला आहे. त्या तुलनेत दागिने आणि कपड्यांच्या व्यवसायाला फारशी तोशीस सहन करावी लागलेली नाही.उल्हासनगरमधील कापड, जीन्स आणि फर्निचर मार्केटमध्ये अजून मंदीचेच वातावरण आहे, तर भिवंडीचा यंत्रमाग व्यवसायही जीएसटीच्या फटक्यातून अजून सावरलेला नाही.जीएसटीच्या अंमलबजावणीला महिना झाल्याने त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी ठाण्याच्या बाजारपेठेत वेगवेगळ््या क्षेत्रातील दुकानदार, व्यावसायिकांशी बोलल्यावर ही स्थिती लक्षात आली. जीएसटीचे सॉफ्टवेअर अपडेट करणे, जुना स्टॉक संपवण्यावर व्यापाºयांचा भर आहे. अजूनही मोजक्या दुकानांत ३० ते ४० टक्के सवलतीचे सेल सुरू आहेत. ते अजून आठवडाभर राहतील, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. जीएसटीमुळे कपड्यांच्या दरांत पाच ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागडे कपडे घेण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ग्राहक प्रत्येक दुकानात जाऊन दर विचारतात आणि जिथे कपडे स्वस्त, पण चांगल्या दर्जाचे असतील तेथे खरेदी करत आहेत. आम्ही मुंबई आणि जवळपासच्या परिसरातून होलसेल दराने कपडे खरेदी करीत होतो. आता ग्राहकांवर भूर्दंड नको म्हणून मुंबईबाहेरून होलसेल बाजारातून कपडे आणत आहोत, असे कपड्यांचे व्यापारी समीर वधान यांनी सांगितले. दागिन्यांवर सुरूवातीला १.२ टक्के व्हॅट होता. आता जीएसटी तीन टक्के आहे. जीएसटीमुळे मजुरी वाढली, पण सोन्याचा दर उतरल्यामुळे दागिन्यांना अजून फटका बसलेला नाही. पण ग्राहक कटाक्षाने बिल मागत आहेत. हा आॅफ सिझन असल्याने परिणाम दिसलेला नाही. सणावार सुरू झाले की समजेल. पण जीएसटीमुळे पेपरवर्क वाढले आहे. त्या नोंदींसाठी वेगळा माणूस नेमण्याची वेळ आली आहे, असे सोन्या-चांदीचे व्यापारी कमलेश जैन यांनी सांगितले.औषधांवर जीएसटी लागला, पण तो भार आम्ही ग्राहकांवर लादलेला नाही. अनेक औषध कंपन्यांनी दर कमी करण्यास सुरूवात केली आहे. उदाहरणार्त, नऊ रुपयांचे औषध आठ रूपये करून तो वाचलेला रूपया जीएसटीत समाविष्ट केल्याने ग्राहकांना मिळणाºया किंमतीवर परिणाम झालेला नाही, असे औषध विक्रेते दिनेश चौधरी यांनी सांगितले.जीएसटीमुळे मिठाई-फरसाणच्या खरेदीवरील परिणाम स्पष्ट व्हायला किमान दोन महिने तरी जातील. सध्या आम्ही ग्राहकांकडून जीएसटी घेत नाही. जीएसटी, त्यात श्रावण यामुळे निश्चितच ग्राहकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे, असे फरसाण आणि मिठाईचे व्यापारी संजय पुराणिक यांनी सांगितले.उल्हासनगर मार्केटमध्ये मंदी-फर्निचर, जीन्स, इलेक्टॉनिक, बॅग, गाऊन, सोने मार्केटसह कपड्याच्या जपानी व गजानन मार्केटमध्ये मंदीची लाट आहे. जीएसटी व्यापाºयांना तारक ठरण्याऐवजी मारक ठरत असल्याची टीका युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी केली.उल्हासनगरच्या मुख्य मार्केटमध्ये जीएसटीमुळे उतरती कळा लागली असून ग्राहक फिरकेनासे झाले आहे. जीएसटीच्या बिलाचा धसका व्यापाºयांसह नागरिकांनी घेतल्याची टीका व्यापारी संघटनेने केली. जकातीच्या काळात कच्ची बिले होती. नंतरही एलबीटीवेळी ९० टक्के व्यापाºयांनी विवरणपत्रे भरली नव्हती.आताही जीएसटीच्या काळात धंदा नसताना पगार द्यावा लागतो म्हणून अनेक व्यापाºयांनी कर्मचाºयांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविल्याचे चित्र मुख्य मार्केटमध्ये आहे. नोटाबंदीनंतर सावरण्याच्या प्रयत्नातील मार्केटमध्ये सहा महिने तरी असेच मंदीचे वातावरण राहील, असे व्यापाºयांनी सांगितले.ठाणे आरटीओ विभागाने करामध्ये दोन टक्के वाढ झाल्याने वाहन नोंदणीवरही परिणाम झाला आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर सुरूवातीला लोकांचा फार गोंधळ उडत होता. छोटे छोटे वादही होत होते. आता लोकांना जीएसटी कळल्यामुळे गोंधळ कमी झाला आहे. जीएसटीमुळे २० ते ३० टक्के ग्राहक कमी झाले आहेत. त्यातच श्रावण आल्यामुळे ५० टक्के फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे, असे हॉटेल व्यावसायिक प्रशांत शेट्टी यांनी सांगितले.जीएसटीची घोषणा झाल्यापासूनच घरांचे बुकिंग रोडावले होते. याआधी घर खरेदीवर सवर््िहस टॅक्स व व्हॅट असा साडेपाच टक्के कर होता. तो आता १२ टक्के झाला. या वाढीव करामुळे अजून घर खरेदीला थंड प्रतिसाद असल्याचे कल्याणमधील बिल्डर जोहर झोजवाला यांनी सांगितले.या महिनाभरात वाहन खरेदीवर जवळपास ५० टक्के परिणाम झाला आहे. जीएसटीबाबत अद्याप सुस्पष्टता आलेली नाही. लोकांनाही त्याबाबत अजून पूर्ण माहिती नाही. वाहनांवरील जीएसटी वाढला आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात ५० टक्के खरेदी घटल्याची माहित वाहन वितरकांनी दिली. पहिल्या दिवसांपासून सॉफ्टवेअर अपडेट केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यंत्रमागांचा फटका कायम -भिवंडी : वार्पिंग, सायझिंग, डार्इंग, जॉब वर्कर, मजुरीचे बीम चालविणारे छोटे पॉवरलूमधारक या सर्वांना हिशेब ठेवणे सक्तीचे झाल्याने आणि कापडावरील करामुळे यंत्रमाग व्यवसायात परसलेली मंदी अजून कायम आहे.कापडावरील कर कमी करण्याचा मुद्दा लोकसभा, राज्यसभेत मांडला जावा यासाठी यंत्रमालधारकांच्या प्रतिनिधींना सोबत गेत मोठे उद्योजक हबीब उर रेहमान यांनी दिल्ली गाठली आहे. या उद्योगात तीन टप्प्यांवर कर आहे, तो एकदाच आकारावा, अशी त्यांची मागणी आहे.आजवर कच्च्या पावत्यांवर चालणाºया पॉवरलूम व्यवसायाला हिशेब ठेवण्याची सवय नव्हती. ती आता लावून घ्यावी लागणार आहे. आपल्या व्यवसायाचे आॅडिट होईल, याची भीती त्यांना अधिक आहे, तेही त्यांच्या विरोधाचे कारण आहे.
जीएसटीने कापला खिसा, बाजारात आणली मंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:26 AM