ठाणे : आपण चार राज्यांत पाहिले तर भाजप सरकारचा विजय झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत लोकांनी मोदी सरकारलाच निवडून आणण्याचे ठरवले आहे. मोदींची गॅरंटी लोक स्वीकारतात त्यावर विश्वास ठेवतात. इतरांनी दिलेली गॅरंटी फेल होते पण मोदींची गॅरंटी फेल होत नाही. लोकांनी देखील गॅरंटी दिली आहे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा मोदी सरकारच येणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वंकष स्वच्छता मोहिमेची सुरूवात केली. यावेळी त्यांनी यावरही भाष्य केलं. ठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करावेत जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पध्दतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करावीत. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाही. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे, त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करा, जेणेकरुन त्याचे दृश्य स्वरुप नागरिकांना दिसेल, असे ते म्हणाले.
वाहतूक कोंडीचा त्रास होऊ देऊ नकाठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वच्छता अभियानाचे ठाणे महानगरपालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचेही ते म्हणाले.