- प्रशांत मानेकल्याण : लालचौकी परिसरातील आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून ते तेथून बाहेर पडल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा.डॉ. श्रीकांत शिंदे हे तेथे दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले. भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांतील संबंध सौहार्दपूर्ण होत असताना हा पाठशिवणीचा खेळ का खेळला गेला, असा सवाल उपस्थितांनी केला. या महोत्सवाचे प्रमुख आमंत्रित, आगरी समाजाचे तथा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे शनिवारी डोंबिवलीत पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित होते; मात्र त्यांनीही महोत्सवाला जाणे टाळले, अशी चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी कल्याण शहरातील तीन कार्यक्रमांना हजेरी लावली. मोहने येथील एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याशिवाय, खडकपाडामधील डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ आणि लालचौकी परिसरातील आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासही मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, रमेश पाटील, उपमहापौर उपेक्षा भोईर आदी राजकीय मंडळींसह जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी हजेरी लावली होती.शुक्रवारी या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी आगरी-कोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले होते; परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यामुळे महोत्सवाच्या समारोपाला मुख्यमंत्र्यांसमवेत ते नक्कीच येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री महोत्सवातून बाहेर पडल्यानंतर पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यांची ही ‘उपस्थिती’ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली. गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेनेचे संबंध सुधारले असतानाही दोघे एकत्र व्यासपीठावर न येण्याचे कारण योगायोग आहे की अन्य काही आहे, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. खा.डॉ. श्रीकांत शिंदे हेही मुख्यमंत्री असताना हजर नव्हते. तेही पालकमंत्री शिंदे यांच्यासमवेतच कार्यक्रमस्थळी हजर झाले होते.मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम असला, तर त्यावेळी पालकमंत्र्यांची आवर्जून उपस्थिती असते. त्यामुळे या पाठशिवणीच्या खेळाचे अनेकांना आश्चर्य वाटले.यासंदर्भात पालकमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांचा मोबाइल बंद होता. खा. श्रीकांत शिंदे हेही उपलब्ध झाले नाहीत. आगरी-कोळी महोत्सवाचे प्रमुख संयोजक, शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर म्हणाले की, एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना महोत्सवामध्ये पोहोचण्यास काही वेळ उशीर झाला.>नाईक यांनी मारलेल्या दांडीवरून चर्चागेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक शनिवारी डोंबिवली येथे पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते; परंतु कल्याणमधील महोत्सवाला ते आले नाही.प्रमुख आमंत्रित असतानाही नाईकांनी महोत्सवाला मारलेली दांडी चर्चेचा विषय ठरली आहे. ते डोंबिवलीतील मेळाव्यासाठी सायंकाळी ४ वाजता आले. हा मेळावा सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर, नवी मुंबईला अन्य एक कार्यक्रम असल्याने तातडीने रवाना झाले, अशी माहिती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री गेल्यानंतर पालकमंत्री आले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:35 AM