ठाणे : ठाण्यातील बहुचर्चित कोपरी पूल लष्कराकडून बांधण्यात यावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हीच मागणी यापूर्वी भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.लाखो ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या व मुंबई-ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी कोपरी पूल बांधण्याचे काम लष्कराला देण्याची पहिली मागणी नगरसेवक डुंबरे यांनी ३० आॅगस्ट रोजी केली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक निवदेनही दिले होते. पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी येथे नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र, त्याला दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोपरी पुलाचे कामही लष्कराकडे सोपवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोपरी पुलाचे काम लष्कराकडे सोपविण्याची पालकमंत्र्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:44 AM