श्रीनगर - मनमोहक रांगोळ्या... फुलांची आरास... आलेल्या पाहुण्यांचे कुंकूम तिलकाने स्वागत.. गुढीपूजन.. आणि बरच काही हे चित्र कल्याण डोंबिवली किंवा ठाणे शहरातील नाही. तर ही सर्व लगबग सुरू होती ती चक्क जम्मू काश्मीरमध्ये. कारण, डोंबिवलीकरांनी यंदाचा पाडवा जम्मू काश्मीरमध्ये जाऊन साजरा केला आहे. हम है ना... म्हणत येथील हम या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेनं ही गुढी उभारली होती.
मुंबईची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात आजही पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने सण साजरे केले जातात. आपले हे वेगळेपण जपत यंदा डोंबिवलीकरांनी थेट जम्मू काश्मीरमध्ये जाऊन गुढीपाडवा साजरा केला. डोंबिवलीतील "हम" संस्थेच्या सदस्यांनी या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. नववर्षाचे औचित्य साधून जम्मू कश्मीरमधील भारतीय शिक्षा समितीच्या शाळा व वसतिगृहांना भेट देण्यात आली. त्यावेळी गुढीपाडव्याचे पारंपारिक सेलिब्रेशन पाहून जम्मू काश्मीरमधील नागरिकही भारावून गेले. अगदी लेझीम नृत्यावरही येथील नागरिकांनी ठेका धरला.
भारतीय शिक्षा समितीच्या जम्मूमधील शाळेत गुढीपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीपप्रज्वलन, प्रार्थनाही झाली. डोंबिवलीकरांनी हिंदी भाषेतून गुढीपूजन व गुढीपाडवा याबद्दल स्थानिकांना माहिती दिली. सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे व उर्वरित भारताशी ते मनाने जोडले जावेत, याकरिता "हम" ही संस्था "जोडो कश्मीर" या अभियानातंर्गत शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे.