ठाणे : सध्याच्या फ्लॅट संस्कृतीत उंच गुढ्या उभारण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने दिवसेंदिवस मिनी गुढ्यांचा ट्रेंड वाढत चालला आहे. केवळ तांब्याचेच नव्हे, तर पंचधातूचे, अन्य धातूंचे आकर्षक गडू, विविधरंगी वस्त्रांसह परंपरेत खास महत्त्व असलेल्या रेशमी महावस्त्राच्या गुढ्यांना सर्वाधिक पसंती आहे. लहान मुले, महिलांचे बचत गट, वेगवेगळ््या संस्थांनी बनविलेल्या गुढ्यांची खरेदीही आवर्जून होताना दिसते. मोत्यांच्या माळांनी, मोगऱ्याच्या गजऱ्यांनी, सॅटीनच्या कपडाने सजलेल्या आकर्षक मिनी गुढ्या पाडव्याची मराठमोली परंपरा उंच उंच नेताना दिसतात. मिनी गुढ्यांमधील सर्वात लहान गुढी चारचाकी वाहनांमध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आकर्षक सजावट करुनच मिनी गुढी उपलब्ध असल्याने, जागाही कमी लागते, आकर्षक रंगसंगतीचा आनंद मिळतो आणि जागाही वाचते, असा बहुउद्देशीय विचार ग्राहकांकडून होताना दिसतो. घरातही या गुढींची पुजा केली जाते आणि भेटवस्तू म्हणूनही मिनी गुढी दिल्या जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लाल, नारिंगी, गुलाबी, मोरपंखी, पिवळा, हिरवा अशा विविध रंगांमध्ये या गुढ्या मिळतात. सहा इंच, १० इंच व १२ इंच अशा तीन आकारांत त्या उपलब्ध असून याची किंमत साधारण १४०, १७०, १९०, २४० अशी आहे. (प्रतिनिधी)
गुढी मिनी, तरीही परंपरा जपण्याचा आग्रह!
By admin | Published: April 06, 2016 4:10 AM