प्रज्ञा म्हात्रे, ठाणे/ स्नेहा पावसकर, ठाणे/जान्हवी मोर्ये, डोंबिवलीगुढीपाडवा म्हटले की, डोळ्यांपुढे उभ्या राहतात आकाशी झेप घेणाऱ्या उंच गुढ्या. सोबतच, गोडवा वाढवणारे श्रीखंड. अनेक जण यानिमित्ताने आंबा खायला सुरुवात करतात. पूजेतही अनेकांना आंबा लागतो. त्यामुळे फळांच्या या राजालाही छान भाव आलाय. एकंदरीतच सर्वत्र दिसतो आहे, पाडव्याचा उत्साह. खरेदीचा आनंद आणि परंपरा जपण्यासाठी सुरू असलेली लगबग... नोटाबंदीनंतर आलेली मरगळ झटकून देत गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, मीरा-भार्इंदर या शहरांतही सणानिमित्त असाच उदंड उत्साह असल्याने रविवारी खरेदीसाठी सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. घरे, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी आॅफर्सची झुंबड उडाल्याने खरेदीच्या आनंदाचा गोडवा वाढला होता. परंपरा जपणारा सण म्हणून गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा काढल्या जातात. त्यांची तयारी जशी अंतिम टप्प्यात आली आहे, तशीच पारंपरिक वस्तू खासकरून पैठणी, अप्रतिम कलाकुसरीचे दागिने यांच्या खरेदीतील नजाकत जपली जाते. पाडवा म्हणजे श्रीखंड हे पक्वान्नातील समीकरण असल्याने श्रीखंडाच्या मागणीने नवा उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर मिठाई, पक्वान्नातील अन्य पदार्थांची मागणीही दिवसेंदिवस वाढत असल्याचे ठिकठिकाणच्या बाजारपेठांत फेरफटका मारल्यावर दिसून आले. पाडव्याच्या दिवशी सकाळी देवदर्शनासाठी जाण्याचा ‘ट्रेण्ड’ सेट होत असल्याने देवळांनी, त्यातील देवतांनीही नवा साज ल्यायला आहे. फुले, फळे, सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य यातही नव्याची नवलाई दिसून येत आहे. गुढी उभारणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यासाठीचे साहित्यही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातही मिनीगुढ्यांना अधिक मागणी आहे. पाडव्याला सकाळच्या वेळी शुभेच्छा देण्यास बाहेर पडणाऱ्या तरुणाईमुळे हल्ली त्या दिवशी लवकर उघडणाऱ्या हॉटेलच्या संख्येतही वाढ होते आहे. फायनान्स स्कीम फायदेशीरगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याचे अनेकांचे बेत ठरलेले असतात. ते वाट पाहत असतात आॅफर्सची. या पाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीमध्ये हल्ली फायनान्स स्कीमच मोठ्या प्रमाणात ग्राहकांना मिळतात आणि त्याच ग्राहकांना आकर्षित करतात, अशी माहिती श्री जैन ट्रेडर्सचे सुरेश जैन यांनी दिली. मुळातच, गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. उदाहरणार्थ- पूर्वी १०-१२ हजार रुपयांना मिळणाऱ्या टीव्हीची किंमत आता १८-२० हजार झाली आहे. मात्र, त्यातही ग्राहक आपले स्टॅण्डर्ड पाहून ते जपण्यासाठी थोडे अधिक पैसे गेले तरी चालतील, पण ब्रॅण्डेड आणि मोठी वस्तू घेऊ, असा विचार करतात. हेच ओळखून या फायनान्स स्कीममध्ये महागड्या वस्तूंवर लाँग टर्मचा कालावधी दिला जातो. त्यामुळे ग्राहकांना त्या अधिक सोयीच्या ठरतात. मोठा हप्ता भरण्यापेक्षा जास्त काळ आणि कमी हप्ता भरणे ग्राहकांना परवडते, म्हणून ते त्याला पसंती देतात. ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या बाजारात १५ महिने, १८ महिने इतका कालावधी असलेल्या स्कीम मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. एखाद्या वस्तूवर दुसऱ्या काही वस्तू मोफत देणे या स्कीम आता फारशा चालत नाहीत. कारण, ग्राहक मोफत असलेली वस्तू रद्द करून त्याचे पैसे मूळ वस्तूतून कमी करा, असे अनेकदा सुचवतात. तरीही, मोठ्या टीव्ही संचावर साउंड सिस्टीम फ्री अशी स्कीम सध्या सुरू आहे, असेही जैन यांनी सांगितले. गुढीपाडव्यादरम्यान उन्हाळ्याचा काळही सुरू झालेला असतो. त्यामुळे फ्रीज, एसी अशा वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. तसेच एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा संपतात. मात्र, विविध स्कीम, आॅफर गुढीपाडव्याच्या दिवसांतच असतात. त्यामुळे अनेक जण या मुहूर्तावर आॅफरचा फायदा घेऊन टीव्ही बुक करून ठेवतात आणि सोयीने नंतर घरी घेऊन जातात. मोबाइलखरेदी हल्ली लोक वर्षाचे १२ महिने करतात. मात्र, पाडव्याच्या मुहूर्तावर त्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. यातही फायनान्स स्कीम पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठरावीक मोबाइलवर मेमरीकार्ड, पेनड्राइव्ह फ्री स्कीम बाजारात दिसतात, असेही जैन यांनी सांगितले. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाणे बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा सुमारे १२ ते १५ कोटींचा व्यवसाय होतो, असे ते म्हणाले. बासुंदी, चिरोटेही लोकप्रियमिठाई, श्रीखंडांबरोबर काही मराठमोळ्या पदार्थांचीही विक्री या दिवशी अधिक होते. पुरणपोळी, सीताफळांची बासुंदी, चिरोटे हे पदार्थ प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विकले जातात, असे गोरसगृहाचे संजय पुराणिक यांनी सांगितले. उन्हाळ्यात आमरसाची चलती असते. या आमरसाच्या विक्रीला पाडव्यापासून सुरुवात होणार आहे. २०० ते ४०० रुपये किलो याप्रमाणे आमरस विकला जाणार आहे. कोल्हापुरी नेकलेसकडे कलपाडव्याच्या दिवशी दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा कोल्हापुरी नेकलेस हे सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. स्टोन, ब्रॉसम पेण्डलचा वापर यात करण्यात आला आहे. त्यामुळे अशा नेकलेसचे ग्राहकांनी बुकिंग केले आहे. अॅण्टीक चोकर, टेम्पल ज्वेलरी हे सोन्याच्या दागिन्यांमध्ये सणानिमित्ताने पाहायला मिळते. या पाडव्याचे आकर्षण ठरणारा आणखी एक दागिना ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे, तो म्हणजे ‘शिंदे शाही तोडे’. मराठमोळ्या दागिन्यांमध्ये भूषण मानल्या जाणाऱ्या ‘शिंदे शाही तोड्या’चेही बुकिंग झाल्याचे चिंतामणी ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मुरूडकर यांनी सांगितले. हिऱ्यांच्या नेकलेसमध्ये चेंजेबल स्टोन्स, पर्ल यांचा वापर केलेले नेकलेस आले आहे. त्याचप्रमाणे प्रॉन, बेझल, प्रेसे, टेन्शन, पावे, चॅनल असे विविध सेटिंग्सचे नवीन ब्रेसलेट आले आहेत. व्हाइट मेटलमध्ये ब्रेसलेटसह मंगळसूत्र पेंडल व रिंग, कानांतले पाहायला मिळतात. गर्दी टाळण्यासाठी पाडव्याच्या दिवशी दागिन्यांची खरेदी करण्यापेक्षा काही दिवस आधी दागिना पसंत करून बुकिंग केले जाते आणि मुहूर्त म्हणून त्या दिवशी तो दागिना घरी नेला जातो. यापूर्वी पाडव्याच्या दिवशी गुंतवणूक म्हणून नाणे किंवा वळे घेण्याची प्रथा होती. परंतु, ही परंपरा आता बाजूला सारली गेली असून त्याऐवजी थेट दागिनाच खरेदी केला जातो. दागिना वापरता येतो, या दृष्टिकोनातून आता थेट दागिना खरेदीचा ट्रेण्ड असल्याचे मुरूडकर यांनी सांगितले. पैठणीत लाल, राणी कलर प्रियगुढीपाडव्याला पैठणी, सेमीपैठणी खरेदी करण्याकडे महिलांचा सर्वाधिक कल असतो. गुढीपाडवा आणि पैठणी हे जणू समीकरणच झाले आहे. पैठणीचा नवा ट्रेण्ड बाजारात पाहायला मिळत आहे. पैठणी, सेमीपैठणी याबरोबरच कलाक्षेत्र सिल्क, कांजीवरम, रॉ सिल्क, पेशवाई सिल्क, सिंगल व डबल पल्लू पैठणी, महाराणी पैठणी, शाही पैठणी, पी कॉक बॉर्डर प्युअर सिल्क हे प्रकार पाडव्याच्या निमित्ताने साड्यांमध्ये आले आहेत.सेमीपैठणी, पेशवाई पैठणी, कलाक्षेत्र सिल्क या साड्यांना महिलांची अधिक पसंती असून पैठणीमध्ये सध्या राणी आणि लाल रंगांची चलती असल्याचे पेशवाईच्या सीमा महाजन यांनी सांगितले. तीन हजारांपासून पुढे प्युअर सिल्क, तीन ते चार हजारांपर्यंत बनारस सिल्क, २३५० रुपयांपासून पुढे सेमीपैठणी आणि ६७०० पासून अगदी ४५ हजारांपर्यंत पैठणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ४५ हजारांच्या पैठणीची काठ ही प्युअर जरीपासून बनवण्यात आली असल्याचे महाजन यांनी सांगितले. मुनिया पैठणी हे यंदाच्या पाडव्याचे आकर्षण राहणार आहे. कारण, या पैठण्यांचे मोरांचे, फुलांचे असे काठ आहेत. यात केवळ सिंगल पीस येत असून किंमत १५ हजारांपासून पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. या सणाच्या निमित्ताने पूजेसाठी नऊवारी साडीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यात कांजीवरम, धर्मावरम, पेशवाई सिल्क, गढवाल सिल्क, आर्ट सिल्क, सेमीपैठणी, नारायण पेठ, इंदुरी, महेश्वरी, प्युअर पैठणी असे प्रकार असून या साड्या १५०० रुपयांपासून पुढे आहेत. डिझाइन पाहून मिठाईची खरेदीपाडव्याच्या निमित्ताने विविध प्रकार, रंगांच्या मिठार्इंनी दुकाने सजली आहेत. यात काजू ड्रायफ्रूट फॅण्सी स्वीट्स प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. गोल्डन गुलाब (१४०० रु. किलो), टोबल नट (१४०० रु. किलो), काजू पेरू (१४०० रु. किलो), काजू डिलाइट (१३०० रु. किलो), काजू पुष्प (१३०० रु. किलो), काजू बोनिटा (१३०० रु. किलो), अहिम (१३०० रु. किलो), स्वीट मेलन (१४०० रु. किलो), काजू नौका (१४०० रु. किलो), काजू हंडी (१४०० रु. किलो) या प्रकारांच्या मिठाई पाडव्याच्या निमित्ताने खास विक्रीसाठी उपलब्ध आहेत. डिझाइन्स पाहून मिठाई खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे टीपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा यांनी सांगितले. याचप्रमाणे मलई केक (६८० रु. किलो) आणि मलई पुरी पेढा (६०० रु. किलो) या मिठाईला अधिक पसंती आहे, असे ते म्हणाले. बंगाली मिठाई, अंगूर बासुंदी, रसमलाई खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे, असेही त्यांनी सांगितले. एरव्ही, पाव किलो श्रीखंड खरेदी करणारे खवय्ये अर्धा किलो श्रीखंड खरेदी करतात, असेही रोहितभाई यांनी नमूद केले. या सणाच्या निमित्ताने केसर (३०० रु. किलो), इलायची (२८० रु. किलो), आम्रखंड (३२० रु. किलो), फ्रूटश्रीखंड (३६० रु. किलो), ड्रायफ्रूट श्रीखंड (४०० रु. किलो) हे पाच प्रकार पाहायला मिळणार आहेत. एरव्ही, फक्त दोन प्रकारांचे श्रीखंड पाहायला मिळते. याव्यतिरिक्त स्ट्रॉबेरी, मिरची, रासबेरी, चिकू, संत्री, मोसंबी या व्हरायटी खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.
गुढीपाडवा सण मोठा... नाही आनंदाला तोटा!
By admin | Published: March 27, 2017 6:08 AM