कल्याण : यंदाही कल्याण संस्कृती मंच यांच्यावतीने काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सनई चौघडे आणि लेझीम, टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गस्थ होणाऱ्या स्वागत यात्रेला शहराच्या मुख्य चौकात ढोल पथकांच्या वतीने सलामी देण्यात आली. स्वागतयात्रेतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जलजागृतीपर संदेश देण्यात आला.यंदाचे यात्रेचे हे १९ वे वर्ष. हिंदूंचे सण आणि त्यांचे महत्त्व सांगणारे चित्ररथ, देखावे अशी यावर्षीची संकल्पना होती. कल्याणधील व्यावसायिक गौतम दिवाडकर हे या स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष होते. सिंडिकेट येथून सकाळी सात वाजता यात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन झाले.आ. नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेविका वीणा जाधव, माजी नगरसेवक गणेश जाधव, स्वागताध्यक्ष दिवाडकर, संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. वसंतराव काणे, कार्यवाह श्रीराम देशपांडे, सहकार्यवाह अतुल फडके, उद्योजक अमित धात्रस, शरद वायूवेगळा आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. गुढी पूजनानंतर निघालेली यात्रा सुभाष चौक, रामबाग, सहजानंद चौक, शिवाजी चौक, अहिल्याबाई चौक, गांधी चौक, पारनाका, लाल चौकी येथून मार्गस्थ होत नमस्कार मंडळ येथे यात्रेचा समारोप झाला. स्वागत यात्रेच्या मार्गावर संस्कार भारतीने रांगोळ्या काढल्या होत्या. बाल शिवाजी आणि बाजीराव पेशवा यांच्या वेशभूषा साकारु न मुले घोड्यावर तर महिला आणि तरुणी फेटा आणि नऊवारी साडी असा मराठमोळा वेष परिधान करु न दुचाकीवरून यात्रेत सहभागी झाल्या. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘स्वच्छ कल्याण, सुंदर कल्याण’, पर्यावरण संवर्धन या लक्षवेधी चित्ररथांसह केडीएमसीच्या वतीने जलजागृती सप्ताहानिमित्त चौकात सादर झालेले पथनाट््य विशेष आकर्षण ठरले. यात्रेच्या मार्गावर ‘संस्कृती’ आणि ‘राज’ या ढोलपथकांनी विशेष दाद मिळवली. रामबाग आणि अहिल्याबाई चौकात या यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तत्पूर्वी संतोषी माता मंदीर रोडवर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. विशेष म्हणजे दुरूस्तीसाठी बंद असलेले अत्रे नाट्यगृह लवकर सुरू व्हावे म्हणून टिळक चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तर येथेच भावगीत आणि भक्तीगीताचा कार्यक्र म आयोजित केला होता. यात्रेदरम्यान खा. कपिल पाटील, नगरसेवक प्रकाश पेणकर, शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांनीही उपस्थिती लावली. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी कल्याणमधील प्रसिद्ध काळा तलाव येथे दिव्यांची रोषणाई आणि आवाज विरिहत फटाक्यांच्या आतिषबाजीचा आगळा कार्यक्रमही आयोजित केला होता.पूर्वेतही स्वागत यात्रेचा उत्साहकोळसेवाडी गणपती चौकातील श्री साईबाबा मंदिराजवळ उभारलेल्या गुढीचे पूजन अध्यक्ष आ. गणपत गायकवाड यांच्या हस्ते झाले. आणि त्यानंतर स्वागतयात्रेची सुरुवात झाली. या वेळी समितीचे मान्यवर उपस्थितीत होते. कोळसेवाडी येथून निघालेली ही स्वागतयात्रा म्हसोबा चौक, तिसगांव रोडमार्गे तिसाई मंदिरासमोर आली. तेथेच या यात्रेचा समारोप झाला. समारोप सोहळ्यात साईसिध्दी ग्रुप रेल्वे प्रवासी भजनी मंडळ तसेच शाळांमध्ये प्रथम पारितोषिक सम्राट अशोक विद्यालय यांना सन्मानित करण्यात आले.>सामाजिक चित्ररथस्वागत यात्रेतील चित्ररथांमध्ये ‘चिनी वस्तूंचा बहिष्कार करा, स्वदेशीचा स्वीकार करा’, प्लास्टीक बंदीचा संदेश, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, स्वच्छ भारत अभियान, व्यसन मुक्ती, तसेच शिवचरित्रातील काही देखावे, कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती, यांसारखे समाज प्रबोधनपर चित्ररथ होते. तसेच लेझीम, दांडपट्टा, आदिवासी नृत्य, विद्यार्थ्यांचे मल्लखांब आणि योगासने, महिलांची बाईक रॅली हे या वेळी आकर्षणाचा विषय ठरले.
Gudi Padwa 2018 : लेझीम, टाळ, मृदुंगाच्या गजरात स्वागत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:42 AM