लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मंगळवारी चैत्र मासारंभ अर्थात गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. कोरोनच्या पुन्हा वाढत्या संसर्गामुळे यंदाही गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या साजरा झाला नाही. ठाणे-डोंबिवलीसह राज्यात कुठेही नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या नाहीत. मात्र घरोघरी सुख-समृद्धी आणि निरोगी आयुष्याची गुढी उभारली गेली आणि पाडव्याच्या शुभेच्छा सोशल मीडियावरून एकमेकांना दिल्या गेल्या. विशेष म्हणजे यंदाच्या शुभेच्छा संदेशात 'कोरोनाचे आपल्यावरील संकट टळू दे आणि सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे,' याचा आवर्जून उल्लेख पाहायला मिळाला.
जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा, त्याचे परिणाम सोशल मीडियावर पाहायला मिळतातच. मंगळवारी सकाळपासून पाडव्याच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट होत होत्या. व्हाॅट्स ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरद्वारे एकमेकांना शुभेच्छा देत आपापल्या घरी उभारलेल्या गुढी, रांगोळीचे फोटो अपलोड केले जात होते; पण यात प्रत्येकाने सामाजिक भान राखत यंदा तरी कोरोनाचे संकट दूर होण्याचीही इच्छा व्यक्त केलेली पाहायला मिळाली. ‘नववर्षाचा संकल्प करूया, संयम बाळगूया, कोरोनाला हरवूया...’, ‘गुढी उभारू एकजुटीची, आलेल्या संकटावर मात करण्याची...’, ‘याही वर्षाची गुढी जबाबदारीची, नियम पाळण्याची, आरोग्याच्या संरक्षणाची...’, ‘कोरोनामुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करू, यंदाचा गुढीपाडवाही घरात राहून साजरा करू...’, ‘निरोगी आयुष्याच्या गुढीसाठी, स्वच्छता आणि मास्क वापरण्याबरोबरच सरसावू पुढे लसीकरण करून घेण्यासाठी...’ अशा शुभेच्छांतून सकारात्मक संदेश देण्यात आला. याशिवाय पोलिसांची टोपी, थेटस्कोप, लसीकरणाचे इंजेक्शन अशी प्रतीकात्मक चिन्हे वापरून तयार केलेली प्रतीकात्मक गुढीची इमेज लाईक मिळविणारी ठरली.