ठाणे : सहकारी गृहसंस्था निर्माण करण्यापासून ते सदनिकाधारक किंवा सभासद यांचे अधिकार, कर्तव्य, वर्षभरात होणाऱ्या विविध बैठका, देखभाल खर्च, अध्यक्ष, सचिव यांची जबाबदारी, वाद झाल्यास तो सोडविण्याचा कायदेशीर मार्ग, अशा अनेक मुद्द्यांवर सहकारी संस्थेचे ठाणे जिल्हा उपनिबंधक किरण सोनावणे यांनी मार्गदर्शन केले.
विद्याप्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाच्या विधी साहाय्य कक्षाच्या माध्यमातून नुकतेच गृहनिर्माण सहकारी संस्था, त्यासंबंधातील कायदे व नियम आणि रेरा किंवा स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा २०१६ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी सोनवणे यांनी सहकारी संस्थेच्या कायद्याविषयी माहिती दिली. उपस्थितांनी अनेक प्रश्न विचारून त्याचे समाधान करून घेतले. उच्च न्यायालयाचे अधिवक्ता नितीन जाधव यांनी स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा २०१६ अर्थात रेरा कायद्याविषयी माहिती दिली. या कायद्याचे महत्त्व, त्याचा घर खरेदीदारांना होणारा फायदा, विकासकाची जबाबदारी, नियम न पाळल्यास ग्राहकांना असलेले कायदेशीर अधिकार व मार्ग याविषयी मार्गदर्शन केले. ‘गुगल मीट’ या डिजिटल मंचावर हे व्याख्यान झाले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीविद्या जयकुमार व महाविद्यालयाच्या विधी कक्षाचे प्रभारी प्रा. विनोद वाघ यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.