ठाणे - स्वयंरोजगार आणि रोजगार यामध्ये फरक माहित नसलेल्या पंतप्रधान मोदी यांनी उच्चशिक्षित तरुणांना पकोडे विकण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क पदवीधर तरुणांसोबत ठाणे शहरात मोदी पकोडे विक्री आंदोलन केले. विशेष म्हणजे, हे आंदोलन होऊ नये, यासाठी पोलिसांनी जोरदार फिल्डींग लावली होती. मात्र, गनिमी काव्याने चक्क हातगाडी उभी करुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदी पकोडा विक्री आंदोलन केले.
मोदी यांनी पकोडे विकणे हा रोजगारच असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानावर अनेक स्तरातून टीका होत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात पकोडा अर्थशास्त्र अशा आशयाचे फलक ठाणे शहरात लावले होते. हे फलक लावण्यासाठीची परवानगी देखील घेण्यात आलेली असताना हे फलक अचानक पोलिसांनी दडपशाहीचा वापर करुन काढून टाकले होते.
त्यामुळे मोदी पकोडा विक्री केंद्राचे आंदोलनही पोलीस करुन देणार नसल्याचे वृत्त होते. मात्र, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत पवार , कोपरी पाचपाखाडी विभागाचे कार्याध्यक्ष विक्रांत घाग यांनी अचानक ओपन हाऊस येथे चक्क एका हातगाडीसह येऊन मोदी पकोडा, जेटली भजी आदी पदार्थांची विक्री केली.
यावेळी आ. आव्हाड यांनी भाजप सरकारच्या नीतीवर जोरदार टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान स्वत:च म्हणतात की पदवीधरांनी पकोडे विकावे. त्यांच्या विधानानंतर शहरातील काही पदवीधर तरुण आपणाकडे आली. ही मंडळी डॉक्टर, इंजिनियर-पदवीधर आहेत. पण, बेकार आहेत. ते म्हणाले आम्हाला वडे विकायची व्यवस्था करुन द्या; ते आले, जमले आणि त्यांनी वडे विकण्याचा कार्यक्रम केला.
आनंद परांजपे म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोध दशर्विणे हा लोकशाहीचा हक्क आहे. त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत शांतपणे ग्रॅज्यएट स्नॅक्स सेंटरच्या माध्यमातून पदवीधर तरुण वडे- भजी विकणार होतो. पण, भाजपच्या राजकीय दबावाखाली ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली. म्हणून गनिमी कावा करुन पोलिसांची परवानगी नसताही बेरोजगार तरुणांनी हे आंदोलन केले.