मुरलीधर भवार
कल्याण : केरळला भीषण पुराचा तडाखा बसल्याने कल्याणच्या घाऊक बाजारात नारळ आणि मसाल्याची आवक घटली आहे. शहाळी विकणाऱ्या विक्रेत्यांना सध्या गुजरातमधून ती आणावी लागत आहेत. मात्र, पूजाअर्चा आणि जेवणात खोबºयाकरिता वापरल्या जाणाºया नारळाच्या दरात एक रुपयाने वाढ झाली असून गणेशोत्सव काळात नारळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. केरळहून होणारी मसाल्याची आवकही घटल्याने मसाल्याचे दरही वाढले आहेत. मात्र, मसाला पावसाळ्यात केला जात नसल्याने त्याची झळ तूर्तास सर्वसामान्य नागरिकांना बसत नसली, तरी मोठ्या प्रमाणावर मसाले खरेदी करणाºया हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. परिणामी, कालांतराने हॉटेलातील तडका महाग होण्याची शक्यता आहे.
कल्याणमधील नारळ-शहाळेविक्रेते कैलास राखोंडे यांनी सांगितले की, ते ३० वर्षांपासून शहाळेविक्रीचा व्यवसाय करत आहेत. केरळमधून होणारी शहाळ्यांची आवक बंद झाली आहे. कल्याणमध्ये मुख्यत्वे केरळ आणि कर्नाटकातून शहाळे येतात. पावसाचा फटका कर्नाटकलाही बसला असल्याने त्याठिकाणाहून माल कमी येतो. सध्या गुजरातमधून शहाळी येत आहेत. एका शहाळ्याची किंमत ३२ रुपये असून दर वाढलेला नाही. पण, केरळच्या शहाळ्यात जास्त पाणी असते. त्या तुलनेत गुजरातच्या शहाळ्यात कमी पाणी असते. आम्ही किरकोळ विक्रेते असल्याने आम्हाला गुजरातचा माल विकत घेऊन धंदा करावा लागत आहे. हेच शहाळे डोंबिवलीत ४० रुपये दराने विकले जात आहे. पावसाळ्यात शहाळ्याला मागणी कमी असल्याने दर फार वाढलेले नाहीत, असे ते म्हणाले.कैलास ज्यांच्याकडून शहाळी घेतात, ते घाऊक विक्रेते साजन मोहंमद सय्यद यांच्याकडे विचारणा केली असता सध्या गुजरातची शहाळी आणली जात आहे. केरळला पूर येण्यापूर्वी दोन ट्रक माल दररोज येत होता. आता गुजरातहून येणाºया एक ट्रक मालावर भागवून घ्यावे लागत आहे. केरळमधून शहाळ्यांची आवक ठप्प झाली आहे. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाºया नारळाचे होलसेल व्यापारी बी.डी. भानगडे यांनी सांगितले की, लहान नारळ हा सध्या नऊ रुपये दराने विकला जात असून मोठ्या नारळाचा भाव ३० रुपये आहे. घाऊक बाजारात लहान व मोठ्या नारळांच्या किमतीत एक रुपयाने वाढ झालेली आहे. अर्थात, हा नारळ मद्रासहून येतो. त्याचा केरळशी संबंध नाही. केरळच्या पुरामुळे या नारळाची आवक घटली आहे. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे.हॉटेलांमधील तडका महाग होण्याची शक्यताच्मसाल्याचे व्यापारी श्रीनिवास चंद्रकांत म्हणाले की, केरळ हे मसाल्याचे बंदर आहे. केरळ बंदराला पुराचा तडाखा बसल्याने इम्पोर्टेड मसाल्याची आवक ठप्प आहे. हिरवी वेलची पुराच्या आधी १४०० रुपये किलोने विकली जात होती. पुरानंतर आवक घडल्याने वेलचीचा भाव किलोला १७०० रुपये झाला आहे.च्काळी मिरी पुराच्या आधी ५०० रुपये किलो दराने विकली जात होती. आता ६०० रुपये किलोने विकली जात आहे. तर सुपारी २७० रुपये किलो दराने विकली जात होती. सुपारीचा भाव किलोला ३१० रुपये झाला आहे. मसाले पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या आत तयार केले जातात.च् सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरगुती मसाल्याची मागणी सध्या फारशी नाही. मात्र, हॉटेल व्यावसायिकांना मसाले रोजच लागतात. त्यांच्याकरिता मसाला महागला आहे. साहजिकच, मसाले असेच अधिक महागले तर हॉटेलांमधील ‘तडका’ महागण्याची शक्यता यानिमित्ताने वर्तवली जात आहे.