- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील साफसफाईसाठी २७० कंत्राटी कामगार ठेक्या पद्धतीवर घेण्याला कामगार संघटनेसह विविध राजकीय पक्षानी विरोध करूनही ठेक्याला मंजुरी दिल्याच्या निषेधार्थ कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी महापालिका समोर गुरगुंडा आंदोलन केले. यावेळी ठेका रद्द करण्याची मागणी करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा साठे यांनी दिला.
उल्हासनगर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी, साफसफाईसाठी ठेक्क्यावर २७० सफाई कामगारांची नियुक्ती महापालिका करणार आहे. कंत्राटी कामगाराच्या ठेक्यासाठी परस्परांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले भाजप व शिवसेना पक्ष एकत्र येऊन, २७० कंत्राटी कामगार ठेक्यावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून भाजप-शिवसेनेच्या ध्येयधोरणावर शहरातून टीका झाली.
सत्ताधारी शिवसेना पक्षाचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, ओमी कलानी टीम व साई पक्षाने प्रस्तावाला विरोध करून यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. तसेच सर्वच कामगार संघटनेने कंत्राटी कामगार घेण्याला विरोध करून, आंदोलनाचा इशारा दिला होता. कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी महापालिकेत काही राजकीय पक्ष सफाई कामगारात ठेकेदार पद्धत आणू पाहत आहे. त्यांचे कामगारा विरोधातील मनसुबे कामगार संघटना हाणून पाडणार असल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना कंत्राटी कामगार घेण्याला कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी विरोध करण्याचे निवेदन यापूर्वीच देऊन, गुरगुंडा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार साठे यांनी सोमवारी महापालिका प्रवेशद्वार समोर गुरगुंडा आंदोलन करून कंत्राटी कामगार ठेक्याला विरोध दर्शविला. आरोग्य विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी महापालिकेच्या वतीने राधाकृष्ण साठे यांचे निवेदन स्वीकारुन महापालिका आयुक्ताकडे विचारांती निवेदन ठेवण्याचे आश्वासन दिले. महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७०टक्के पदे रिक्त असून वर्ग-३ व ४ ची ३५ टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहे. रिक्त पदे भरून काढण्यासाठी कंत्राटी पदे भरण्याचा सपाटा महापालिकेने लावला असून महापालिका प्रभारी अधिकारी व कामगाराच्या हाता खालचे बाहुले बनल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली.
महापालिकेचा कारभार प्रभारी अधिकारी व कामगाराकडे?
महापालिकेच्या इतिहासात चार उपायुक्त मिळाले असलेतरी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, विधुत व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत, तसेच विधी अधिकारी, भांडार विभाग, पालिका सचिव, विधी अधिकारी, करनिर्धारक, नगररचनाकार संचालक, ४ सहायक आयुक्त आदी पदे रिक्त असून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रभारी पदे देण्यात आली. तरथेट कामगारांची नियुक्ती न करता, प्रत्येक विभागात कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जात आहेत. वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला.