ठाणे : मागील वर्षी राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन त्यात्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय झाला असला, तरी जोपर्यंत ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १९९ शिक्षकांचे समायोजन होणार नाही, तोपर्यंत खाजगी शाळेच्या शिक्षकांचे समायोजन करता येणार नसल्याचे पत्र ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी प्राथमिक शिक्षण संचालकांना पाठवले आहे. परिणामी, शिक्षकांच्या समायोजनामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे.ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे विभाजन झाले असल्याने संपूर्ण राज्यातील खाजगी शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली निघाला असला, तरी ठाणे जिल्ह्यातील खाजगी शिक्षकांचा प्रश्न मात्र प्रलंबित आहे. ठाणे जिल्ह्यातील ११० शिक्षकांच्या समायोजनामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.सन २०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे सप्टेंबर २०१७ मध्ये खाजगी शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही राज्यामध्ये सुमारे १३४२ शिक्षकांच्या जागा रिक्त नसल्याने समायोजन होऊ शकलेले नव्हते. या शिक्षकांच्या समायोजनाचा पुढील टप्पा म्हणजे त्यात्या जिल्ह्यांच्या शिक्षण उपसंचालक कार्यक्षेत्रात म्हणजे विभागस्तरावर समायोजन करण्यात येणार होते. परंतु, यामुळे या शिक्षकांना अन्य जिल्ह्यांत जावे लागणार असल्याने त्यांना कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहावे लागणार होते. कुटुंबाशी निगडित जबाबदाऱ्या व इतर कर्तव्ये पार पाडणे त्यांना अवघड होते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता होती.या बाबींचा विचार करून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्याच जिल्ह्यात व्हावे, यासाठी शासनाने ४ आॅक्टोबर २०१७ रोजी परिपत्रक काढून या शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका) शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत.शिक्षकांचा प्रश्न निकाली कधी निघणार?शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील खाजगी शाळांमधील शिक्षकांना जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार असली, तरी ठाणे जिल्ह्यातील खाजगी शिक्षकांचा प्रश्न मात्र लटकला असल्याने आता या शिक्षकांचा प्रश्न केव्हा निकाली निघणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
खाजगी शाळांतील गुरुजी जि.प. शिक्षकांमुळे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:27 AM