ठाणे : गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास यांचा उत्सव असतो, असे सांगत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तेथे पत्रकारांशी बोलताना विचारे म्हणाले की, ठाकरे यांचा आशीर्वाद आणि दिघे यांची शिकवण यांमुळेच आज माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक खासदार होऊ शकला. मागील ४० वर्षे मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मराठी लोकांसाठी व हिंदुत्वासाठी काम करीत आहे. तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम सर्वसामान्य शिवसैनिक करीत आहेत.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयानेच शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत ‘शिवसेना एके शिवसेना’ या ध्यासाने तळागाळातील लोकांसाठी तसेच ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी काम करीत होते.
दोन शिष्य वेगळे झाले आनंद दिघे यांचे शिष्य शिंदे आणि विचारे हे नेहमी गुरुपौर्णिमा एकत्रित आनंद मठात साजरी करीत होते; पण यंदा राजकीय समीकरण बदलल्याने बुधवारी विचारे हे एकटेच आनंद मठात येऊन ठाकरे आणि दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून गेले. त्यानंतर ते शक्तिस्थळावर गेले होते.