मीरारोड - भाईंदरच्या शिवनेरी नगर येथील किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकान चालकास अमली पदार्थ विरोधी कक्षच्या पथकाने ताब्यात घेत गुटखा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी कक्ष चे हवालदार ए. आर. सपकाळ यांना माहिती मिळाली की, भाईंदरच्या राई शिवनेरी नगर मधील किराणा दुकानदार हा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विकत आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक अमर मराठे याना माहिती सांगितल्या नंतर त्यांच्यासह धनाजी इंगळे, पी. डी. पाटील, पी. डी. टक्के, ए. एस. आव्हाड, व्ही. ए. घरबुडे, ए. बी. यादव यांच्या पथकाने २९ जुलै च्या रात्री शिवनेरी नगर गल्ली क्र. १७ मधील संदीप जनरल स्टोर वर धाड टाकली.
दुकान मालक संदीप रामजी गुप्ता (३०) मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश याच्या दुकानातील वरच्या मजल्यावर पोलिसांना मानवी जीवितास अपायकारक असलेला प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाकू आदींचा साठा सापडला. पोलिसांनी या प्रकरणी ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करत भाईंदर पोलीस ठाण्यात ३० जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील पान टपऱ्या, किराणा आदी दुकानातून सर्रास शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्री चालत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.