भिवंडी -चोराला पकडण्याची,गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसानेच गुन्ह्यात जप्त केलेल्या अडीच लाखाच्या प्रतिबंधित गुटखा मालावर डल्ला मारण्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे.जितेंद्र सुरेश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस शिपाई आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी गुन्हे शाखेने मागील महिन्यात एका गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून मुद्देमाल जप्त करून आयशर कंपनीचा ट्रक आणि त्यामधील प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसाला व गुटख्याच्या गोण्यांचा साठा भिवंडी गुन्हे शाखेच्या आवारात उभा केला होता.
दरम्यान गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस शिपाई जितेंद्र पाटील याला १४ मार्च २०२३ रोजी रात्रपाळी ठाणे अंमलदार डयुटी नेमले होते.त्यावेळी पोलिस कर्मचारी जितेंद्र पाटील याने त्याच्या दोन अज्ञात साथीदारांसोबत संगनमत करून सदरचा प्रतिबंधित गुटखा काळया बाजारात जास्त किंमतीत विक्री करून आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने एकुण २ लाख ५८ हजार ४८ रुपये किंमतीच्या प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसाला या गुटख्याच्या ट्रक मधील सात मोठया गोण्या विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चंद्रभान केदार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी पोलिस शिपाई जितेंद्र पाटील व त्याचे दोन अज्ञात साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .