उल्हासनगर : कॅम्प नं-३, ओटी सेक्शन येथील एका घरात विक्रीसाठी लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा मध्यवर्ती पोलिसांनी सोमवारी दुपारी अड्डीच वाजता पकडला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरातील पानटपरी, हॉटेल आदी ठिकाणी सर्रासपणे तंबाखूजन्य गुटख्याची विक्री होत असून अन्न प्रशासन व औषध विभागाने अनेकदा कारवाई केली. कॅम्प नं-३ ओटी सेक्शन येथील एका घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे मध्यवर्ती पोलिसांनी सोमवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान सचिन कांतालाल गुप्ता याच्या घराची झडती घेतली असता, विक्रीसाठी ठेवण्यात आलेला गुटख्याचा साठा मिळून आला. यामध्ये विमल पान मसाला, शुद्ध पान मसाला, केशर युक्त पान मसाला व तंबाखू पॉकीटे असे एकून ५ लाख ८० हजार ८२५ रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला.
मध्यवर्ती पोलिसांनी गुटखा प्रकरणी सचिन गुप्ता, मुकेश डिंगरा, दिपक वलेच्छा व किशन यांच्यावर गुन्हा दाखल केला. या चौघडीने गुटखा कुठून आणला. यांचे शहरात रैकेट आहे का? आदीतून पोलिस तपास करीत आहेत. असेच गुटख्याचे साठे शहरात अनेक ठिकाणी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.