कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारने हळूहळू व्यवहार पूर्वपदावर आणले. त्यावेळी जीम सुरू करावेत, अशी मागणी होऊ लागली होती. सरकारने साधारण महिन्याभरापूर्वी काही अटींवर जीम सुरू करण्यास परवानगी दिली; परंतु सदस्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे जीम चालकांचे म्हणणे आहे. त्याअनुषंगाने जीममध्ये नियमांचे पालन केले जात आहे का, सदस्यांची काळजी घेतली जाते का, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा विविधांगी आढावा. सदस्यांसाठी वेळ निश्चितठाणे : अनलॉकनंतर काही अटींसह जीम सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात येणाऱ्या सदस्यांची संख्या रोडावली आहे. सदस्यांची संख्या कमी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्नच येत नाही, अशी स्पष्टोक्ती जीमचे मालक-संचालकांनी केली आहे. कमी सदस्यांमुळे मोठे क्षेत्रफळ असलेल्या जीममध्ये आपसूकच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लहान जीममध्ये प्रत्येक सदस्याला येण्याची वेळ निश्चित करण्याची सक्ती केली आहे. थोडक्यात, वेळेचा स्लॉट निवडून त्याप्रमाणे येण्याचे बंधन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आले असल्याचे जीम संचालकांनी सांगितले.अनलॉक १ पासूनच जीम सुरू व्हावी, यासाठी मालक-चालक संघटना सरकारकडे मागणी करीत होते. कोरोनामुळे जीम बंद करण्यात आल्या. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आता जीमला परवानगी देण्यात आली असली, तरी व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. कोरोनामुळे जीममध्ये येऊन व्यायाम करणाऱ्यांची संख्या एकीकडे कमी होत असली, तरी आउटडोअर व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.जीम सुरू झाल्यावर सदस्यांनी प्रवेश घेतला, काही ठिकाणी नवीन सदस्यांची नोंदणी झाली, तर काही ठिकाणी ती १० टक्केच झाली. त्यात मास्क, सॅनिटायझरचा खर्च वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले असल्याचे जीम मालक, संचालकांनी सांगितले. जीम सुरू झाल्यावर पहिल्या पाच दिवसांत वर्दळ होती, परंतु कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सर्वत्र पसरल्यावर ही वर्दळ ओसरल्याचे काही जीममध्ये चित्र आहे. अनेक जीममध्ये सदस्यांना आकर्षित करण्यासाठी ऑफरही ठेवल्या आहेत, परंतु ऑफर्समुळे प्रवेश घेतला तरी प्रत्यक्ष जीममध्ये येऊन व्यायाम करण्याचा श्रीगणेशा अनेकांनी केलेला नाही.मी अजून जीम सुरू केली नाही. जे जीम सुरु झालेत, तिथे नियमांचे पालन केले जात आहे. सदस्य काळजी घेत आहेत. व्यायाम करताना ते हात आणि पाय पूर्ण झाकले जातील, असेच कपडे घालत आहेत, जेणेकरून घाम एकमेकांना लागू नये. व्यवसायावर परिणाम झाला आहे. जिथे एकावेळी ३० ते ३५ सदस्य येत होते, तिथे १० ते १५ सदस्य येत आहेत. आर्थिक नियोजनही कोलमडले आहे. - विनोद पोळ, जीम संचालक,प्रशिक्षकजीमला येणाऱ्या सदस्यांची संख्या कमी झाली आहे. महिलांचे प्रवेश कागदावरच आहेत. त्यांनी प्रत्यक्षात जीममध्ये येऊन व्यायाम सुरू केलेला नाही. जीममध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत. एक घाम पुसण्यासाठी, तर दुसरा बेंचवर टाकण्यासाठी असे दोन नॅपकिन आणायला सांगितले जात आहे. पाण्याची बाटली घरून आणण्याचे आवाहन सदस्यांना केले आहे. - प्रशांत चव्हाण, जीम संचालककोरोनामुळे २५ टक्के जुने आणि १० टक्के नवे सदस्य व्यायामासाठी येत आहेत. येणाऱ्या सदस्याला सॅनिटायझर देणे, तापमान तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, प्रशिक्षक आणि सदस्याने मास्क लावणे हे सर्व बंधनकारक केले आहे. प्रत्येकाला व्यायाम करण्यासाठी एक तासाची वेळ देण्यात आली आहे. - विशाल सावंत, जीम संचालकजीममध्ये मी नोव्हेंबर महिन्यात प्रवेश घेतला. खूप दिवसांनी येऊन व्यायाम सुरू केला, याचा आनंद, समाधान वाटत आहे. व्यायामाची तूट भरून काढण्यासाठी दररोज दीड तास व्यायाम करीत आहे., - सतीश शेट्टी, सदस्यकोरोनाचे सर्व नियम पाळून मी व्यायाम करते. इतके दिवस व्यायाम थांबल्याने ती तूट भरून काढण्यासाठी थोडा अधिक व्यायाम करीत आहे. जीम सुरू होण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. - शर्वरी बोरसे, सदस्य अंबरनाथमध्ये बहुतांश नियम बसवले धाब्यावर -पंकज पाटीलअंबरनाथ : व्यायामशाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात सर्व नियम पाळून प्रवेश दिले जात होते. मात्र आता नियम धाब्यावर बसवले जात आहेत. व्यायामशाळेच्या प्रवेशद्वारावर शोभेसाठी हॅण्ड सॅनिटायझर बसविण्यात आले आहे. मात्र त्याचा वापर काही प्रमाणातच केला जात आहे. व्यायामशाळेचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात नसल्याची तक्रार काही नागरिक करीत आहेत.मोजक्याच व्यायामशाळा नियमांचे पालन करत आहेत. हात धुण्यासाठी सक्षम यंत्रणा दिसत नाही. साहित्याचा वापर करताना तीच वस्तू दुसऱ्याला वापरायची झाल्यास त्याचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज असते. मात्र ते होत नाही. मास्कचा वापर न करताच व्यायाम करताना नागरिक दिसत आहेत. काही नागरिक हे सॅनिटायझर न वापरताच साहित्याचा वापर करीत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका आहे. व्यायामशाळा फुल्ल झाल्या असल्या तरी काही नागरिकांनी व्यायामशाळेतील गैरसोयी पाहून व्यायामशाळेत व्यायाम न करता सकाळी खुल्या वातावरणात व्यायाम करणे पसंत केले आहे. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.व्यायामशाळेत किंवा पाॅश फिटनेस सेंटरमध्ये नियम पाळले जात नाहीत. एकाच साहित्याला कोणीही स्पर्श करतो. त्यासाठी कोणतेच नियम आड येत नाहीत. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा स्पर्श झाल्यास व्यायामशाळेत संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यायामशाळेत न जाता बाहेरच व्यायाम करणे पसंत करतो. - तुषार जाधव, अंबरनाथसुरुवातीचे काही दिवस प्रत्येकाचे तापमान पाहिले जात होते. ऑक्सिजन पातळी तपासली जात होती. मात्र काही कोरोनाग्रस्त रुग्णांना तापमानाचा किंवा ऑक्सिलेव्हलचा त्रास नसतो. त्यामुळे व्यायामशाळेत कोण कोरोनाग्रस्त आहे हे कळत नाही. अशा वेळी संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक वेळी साहित्याला हात लावताना हात स्वच्छ करणे गरजेचे आहे. ते अनेक ठिकाणी होत नाही. - उदय गुप्ता, अंबरनाथ
जीम झाली सुरू, पण व्यायाम घरच्या घरीच; कोरोनाची भीती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:48 AM