उल्हासनगर : हाजीमलंग बाबा दर्ग्यावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते रविवारी रात्री साडेसात वाजता आरती करीत असताना दोन गट आमने-सामने आले. यावेळी दुसऱ्या गटाने घोषणाबाजी केली व मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी दोन्ही गटांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून चारजणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजी मलंग बाबा पहाड दर्ग्यावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे राजेश गायकर, अजय भंडारी, अरुण साळवे, रमेश पाटील, गणेश फुलोरे यांच्यासह १५ ते २० जण विनापरवाना व कोरोना नियमाचे उल्लंघन करून रविवारी रात्री साडेसात वाजता आरती करीत होते. त्यावेळी पहाडी परिसरात राहणारे मुना शेख, झाकीर शेख, मोहम्मद अली, गुरू शेख, हुसेन अन्सारी, तौकीक मुनिर शेख, सरफरोज शेख यांच्यासह २० ते २५ जणांनी आरतीच्या ठिकाणी रात्री आठ वाजता धाव घेतली. त्यांनी आरती करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसमोर घोषणाबाजी केली व त्यांच्या अंगावर धावून गेले, असा दावा विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाला. सरकारी नियमात अडथळा व कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मुन्ना शेख यांच्यासह २० ते २५ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाला.
हिललाईन पोलिसांनी विनापरवाना व कोरोना नियमाचे उल्लंघन करून हाजी मलंग बाबा पहाडी दर्ग्यावर आरती करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या राजेश गायकर यांच्यासह १५ ते २० जणांवरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नोटिसा पाठविल्या असून, आतापर्यंत चारजणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पोलीस अधिक तपास करीत असून, अन्य काहीजणांना अटक करण्याचे संकेत दिले. तसेच हाजी मलंग बाबा पहाडी दर्ग्यावर पोलीस बंदोबस्त वाढविल्याची माहिती पोलिसांनी दिली.
.........