भिवंडी : एकीकडे रूग्णांना वेळेत औषधे मिळत नसताना सरकारी रूग्णालयात रक्त वाढवणारी औषधे तशीच पडून राहिल्याने गुपचूप कचऱ्यात फेकून दिल्याचे आणि त्यावरील बॅच नंबर समजू नये म्हणून ती जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीजवळ उघडकीस आला आहे.
अंबाडी-दिघाशी रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हा साठा सापडला आहे. आरोग्य विभागाने ही औषधे पुरवली असून अंबाडी ग्रामीण रुग्णालयापासून केवळ ५०० मीटर अंतरावर हा साठा आढळला आहे.पालघरच्या हिंदुस्थान लॅबोरेटरीत या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या तयार झाल्या असून सरकारी यंत्रणेमार्फत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या गेल्या होत्या. ॲनिमियामुक्त भारत अभियानांतर्गत सुदृढ आणि ॲनिमियामुक्त मूल जन्माला यावे, म्हणून लोह, कॅल्शियमसोबत पोषण आहारात या गोळ्या दिल्या जातात.
दोषींवर कारवाईची मागणी अंबाडीतील नाझिब धुरू या तरुणास हा प्रकार दिसून आला. त्यांनी ही माहिती श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांना दिल्यावर त्यांनी गणेशपुरी पोलिस आणि वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राला तसे कळवले. श्रमजीवी संघटनेने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
दोन हजारांहून अधिक गोळ्या असल्याचा अंदाजया गोळ्यांची मुदत गेल्या वर्षी जुलैत संपली. बॅच नंबरवरून गोळ्या कोणत्या शासकीय दवाखान्याला पुरविण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळेल. त्याचा तपास सुरू आहे. गोळ्या मुदतबाह्य असतील तर त्या संबंधित कंपनीला परत करण्याची तरतूद असते. मात्र अशाप्रकारे फेकून देणे चुकीचे आहे. अशा गोळ्यांची चारशे ते पाचशे पाकिटे होती. एका पाकिटात दहा गोळ्या असतात. त्यामुळे दोन हजारांहून अधिक मुदतबाह्य गोळ्या फेकण्यात आल्याचा अंदाज वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे यांनी व्यक्त केला.