उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणारे व प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील सफ़ाई कामगारांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी महापालिकेत अर्धनग्न आंदोलन केले. अखेर आयुक्त, कंपनी व संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावून कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यावर, गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले आहे.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा व प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफ़ाईचा ठेका कोणार्क नावाच्या कंपनीला दिला आहे. दोन्ही ठिकाणी काम करणारे कंत्राटी कामगारांच्या मागणीसाठी लढा कामगार संघटनेने वेळोवेळी आवाज उठविला आहे. संघटनेचें अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी कामगार आयुक्त कार्यालयाचे याबाबत दरवाजा ठोठावला असून महापालिका सहकार्य करीत नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. महापालिका शहरातील कचरा उचलण्यावर दररोज ८ लाख व वर्षाला ३० कोटी तर प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईवर वर्षाला १२ कोटीचा असे एकून ४० ते ४५ कोटी खर्च करीत आहे. मात्र संबंधित कंपनी कामगारांना कामगार कायद्या प्रमाणे किमान वेतन न देणे, कामगारांना ओळख पत्र न देणे, अनियमितपणे वेतन देणे, पेमेंट स्लिप न देणे, कामगार व त्यांच्या कुटुंबांना ईएसआयसीची सुविधा उपलब्ध करून न देणे, ओव्हर टाईम न देणे, विना नोटीस कामावरून काढून टाकणे आदी विविध मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेसमोर आमरण उपोषण केले. पालिकेच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते.
महापालिकेच्या आश्वासनानुसार कामगार नेते संदीप गायकवाड बैठकीला गेले. मात्र बैठकीला आयुक्त अजित शेख व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने, चर्चा करायची कोणासोबत? असा प्रश्न गायकवाड यांनी व्यक्त करून प्रशासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले. अखेर आयुक्त अजीज शेख व कंपनी सोबत पुढील बैठक बोलविण्याचें आश्वासन दिल्यावर, संदीप गायकवाड यांनी आंदोलन मागे घेतले. गायकवाड यांनी कामगार आयुक्त यांनाही कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन दिल्यावर, कामगार आयुक्तांनी कारवाई बाबत महापालिका आयुक्तांना आदेश दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.