अंबरनाथ : दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार देणे, हे दुकानदारांना बंधनकारक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून ठेवण्यासाठी काही व्यापारी दुकान बंद असतानाही निम्मा पगार देऊन माणुसकी दाखवत आहेत. अद्याप लॉकडाऊन पूर्णपणे जाहीर न झाल्याने कर्मचारी आपल्या गावी जाण्यास तयार नाहीत. मात्र, ज्या दुकानात पगार देण्यास नकार दिला आहे, त्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी गावाला जाण्याचा मार्ग निवडला आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त फटका सोनेचांदी, कापड व्यापारी यांना बसला आहे. या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देणे आता दुकानमालकांना शक्य होत नाही. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमधील व्यावसायिक फटक्यातून सावरत नाही, तोच पुन्हा नव्या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यवसायच होत नसेल तर कामगारांना पगार कुठून द्यावा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांनी दुकानातील कामगारांना कामावरून कमी केले आहे. तर, निम्म्या कामगारांना अर्ध्या पगारावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या ठिकाणी काम मिळणे शक्य नसल्याने हे कामगारही निम्म्या पगारावर काम करण्यास तयार होत आहेत. जे कामगार परप्रांतातून आले आहेत, त्यांनी अपुऱ्या पगारामुळे आणि नोकरीवरून कमी केल्यामुळे गावाला जाण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र, त्यांची संख्या अल्प असून काही दुकानदार आणि त्या दुकानातील कामगार लॉकडाऊन कमी होण्याची वाट पाहत आहेत.
गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील कर्मचारी आधीच कमी केले होते. त्यानंतर, दुकाने सुरू झाल्यावर दुकानमालकांनी जास्तीचे कर्मचारी न भरता आहेत त्या कर्मचाऱ्यांवर कसेबसे काम करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागल्याने दुकानातील कामगारांना सांभाळल्याशिवाय दुकानमालकांना पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्रशिक्षित कामगार पुन्हा मिळत नसल्याने काही दुकानदारांनी या कामगारांना निम्म्या पगारावर कामावर ठेवले आहे.