बदलापूर : राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली, तर त्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या दीडपट संख्येने बेड, ऑक्सिजन, औषधे आणि इंजेक्शन यांची तयारी राज्य सरकारने ठेवल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
कोरोना काळात घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या भगिनीसोबत रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिक, त्याचप्रमाणे शासनही काहीसे गाफील होते. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही महाभयंकर ठरली. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता, रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा, त्यानंतर झालेला काळाबाजार या सगळ्या परिस्थितीमुळे काही काळ यंत्रणाही हतबल ठरली होती. त्यातच आता तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या लाटेत राज्य सरकारची काय तयारी असेल? असा प्रश्न राजेंद्र शिंगणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना दुसऱ्या लाटेत जितके रुग्ण होते, त्याच्या दीडपट म्हणजेच जवळपास १२ ते १३ लाख रुग्णांच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि स्टेट टास्क फोर्सने दिल्या असून त्यानुसार तितक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, बेड्स, औषधे आणि रेमडेसिविरसारखी इंजेक्शन्स सज्ज ठेवल्याचे शिंगणे यांनी सांगितले. ही सगळी तयारी जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी घेतलेल्या या कार्यक्रमात कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि भगिनींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्यासह महिला वर्गाने मोठी उपस्थिती लावली होती.