ठाणे : टीएमटीकडून ठाणे महापालिका हद्दीतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्यास महासभेने मान्यता दिल्यानंतर अंमलबजावणी करण्यास महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी मंजुरी दिली असून त्यानुसार अर्ज करून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.टीएमटीकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्याकरिता महासभेत प्रस्ताव सादर केला होता. त्यास शासनाच्या निकषांच्या आधारे मंजुरी दिल्याने टीएमटीकडून ज्येष्ठांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठांना महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. तो भरून त्यासोबत वयनिश्चितीसाठी आधारकार्डची झेरॉक्स जोडून परिवहनसेवेच्या ठाणे शहरातील लोकमान्यनगर बस टर्मिनस, बी केबिन शिवाजीनगर, आनंदनगर आगार, वृंदावन सोसायटी बस टर्मिनस, कळवा डेपो, मुल्ला बाग डेपो येथील नियंत्रण कक्ष येथे ते सादर करावेत.
टीएमटीत ज्येष्ठांना आता अर्धे भाडे; अर्ज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:33 AM